पुणे – “लकी ड्रॉ’च्या आमिष एका तरुणाला चांगलेच महागात पडले. मोबाइल तर मिळालाच नाही, त्याच्या मोहापायी तब्बल सव्वासात लाख रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ आली. मित्राकडून पैसे हातउसणे घेऊन तरुणाने चोरट्यांना दिले होते.
हडपसर पोलीस ठाण्यात मुहंमद जुबरील, सरस्वती, सुप्रिया, रॉबर्ट, सूरज शर्मा, संजय चव्हाण, कृष्णा या सात जणांविरुद्ध आयटी ऍक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याबाबत शुभम मोहन भापकर (वय 23, रा. ससाणेनगर, हडपसर) याने फिर्याद दिली. हा प्रकार 20 जुलै 2020 पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला.
गुन्हा दाखल झालेले आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांनी अशाचप्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा मुंबई येथील डोंगरी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
फिर्यादी शुभम हा उच्चशिक्षित आहे. आरोपी मोहंमद याने फिर्यादीच्या मोबाइल फोन करून तुम्हाला लक्की ड्रॉमध्ये दीड लाख रुपये किंमतीचा आयफोन लागल्याचे सांगितले. या खात्री वाटावी म्हणून कंपनीची काही कागदपत्रे शुभमला व्हॉट्स ऍपवर पाठवली होती.
त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादित करून प्रोसेसिंग फिसच्या नावाखाली सुरुवातीला 20 हजार रुपये भरण्यास सांगितले. ते फिर्यादीने भरले. दरम्यान, विमानतळावर कस्टम विभागाने मोबाइल जप्त केल्याचे सांगत फिर्यादीकडून वेळोवेळी तब्बल 7 लाख 25 हजार रुपये ऑनलाइनद्वारे घेतले. दरम्यान, फोन मिळाल्याने पोलिसात धाव घेत तक्रार देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे अडागळे यांनी सांगितले.