कंबरदुखी आणि तीवर साधे उपाय

आजकालची जीवनशैली ही अकारणच घाईगर्दीची आणि पळापळीची झाली आहे. प्रत्येकजण फार म्हणजे फारच बिझी झाला आही, किंवा खरं तर फारच बिझी झाल्याचे भासवत आहे. अगदी शांतपणे चार घास खावेत एवढीही फुरसत नाही, अशी परिस्थिती झालेली दिसते. दिसते-ती तशी आहे असे म्हणता येणार नाही. फार बिझी असण्याची जणू फॅशनच झालेली आहे. या अकारण पळापळीच्या पबदलत्या जीवनशैलीने माणसाला अनेक वेगवेगळे आजार प्रदान केले आहेत. खरं तर माणसाने हे छोटे मोठे आजार स्वतःहून ओढवून घेतले आहेत असे म्हणावे लागेल.आणि अशा बाबतीत महिला मागे नाहीत. अर्थात त्यांच्यामागेही हजार व्याप असतात, नाही असे नाही, पण या व्यापांचा बाऊ केला जातो. मनातआणले आणि ठरवले तर या हे सर्व व्याप शांतपणे सांभाळता येतात. पण एकनूर आदमी दसनूर कपडा प्रमाणे एकनूर व्याप आणि दसनूर त्याचे भांडवल करणे असा प्रकार झालेला आहे. अर्थातच या अकारण व्यापांतून-पळापळीतून, पुरेशी विश्रांती न घेण्यातून अनेक अधीव्याधी मागे लागतातच. या अनेके आधीव्याधींपैकी सतत त्रास देणाऱ्या महत्त्वाच्या म्हणजे डोकेदुखी आणि कंबरदुखी या दोन व्याधी. डोकेदुखीबरोबरच कंबरदुखी या बहुसंख्य महिलांच्या नित्याच्या तक्रारी आहेत.

केवळ मध्यमवयीन वा ज्येष्ठ महिलांच्याच या तक्रारी असतात असे नाही, तर अलीकडच्या काळात तरुणवर्गातही ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. सतत बैठे काम करणे, पुरेशी शारीरिक हालचाल नसणे, चुकीच्या पद्धतीने उठणे-बसणे, पोषक आहाराचा अभाव, वाढते वजन यांसारख्या कारणांमुळे आणि त्याच्याच बरोबरीने सतत टू व्हीलरवरचा प्रवास या सर्व गोष्टींमुळे कंबरदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसते.

मात्र मोठी समस्या दिसत असली, तरी या त्रासावर नियंत्रण आणणे तितकेसे अवघड नाही. योग्य जीवनशैली, पुरेसा व्यायाम, संतुलित आहार आणि शरीराला योग्य शिस्त लावली तर या त्रासावर नियंत्रण मिळवणे सहजशक्‍य आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट-केवळ कंबरदुखी वा डोकेदुखीबाबतच नाही, तर अन्य कोणत्याही तक्रारीबाबत- म्हणजे स्वयंशिस्त. स्वत:च स्वत:ची काळजी घेणे. कंबरदुखी ही अलीकडच्या काळातील सामान्य समस्या बनू लागली आहे. रोजचीच तक्रार बनू लागलेली आहे. अधिक वय असलेल्या व्यक्तींमध्येच ही समस्या दिसून येत नाही तर तरुणांमध्येदेखील ही समस्या वाढत असल्याचे दिसत आहे. खास करून संगणकावर सतत बसून काम
करणाऱ्या, शारीरिक व्यायाम अधिक नसलेल्या तरुण वर्गामध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे. कंबरदुखीची नेमकी कारणे कोणती आणि तिच्यापासून दूर कसे राहता येईल याबाबत जाणून घेऊया.

आपला पाठीचा कणा हाडांनी-मणक्‍यांनी बनलेला असतो. यामधील हाडे सक्रिय भूमिका निभावत असतात. या हाडांच्या गतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होतो तेव्हा कंबरदुखीची समस्या सुरू होते. मणक्‍याच्या हाडांव्यतिरिक्त आपल्या कंबरेच्या बनावटीत कार्टिलेज, डिस्क, सांधा, स्नायू आणि लिगामेंट इत्यादींचा समावेश असतो. यापैकी कुठल्याही भागाला कुठल्याही प्रकारचा त्रास निर्माण झाला म्हणजे कंबरदुखी सुरू होते.
कंबरदुखीमुळे उभे राहणे, वाकणे, वळणे यांसारख्या क्रिया करताना खूप त्रास होतो. सुरुवातीलाच याबाबत उपचार केले नाहीत तर ही समस्या अधिक गंभीर रूप घेऊ शकते. मात्र वेळेवर उपचार केल्यास त्रास कमी करता येतो.

शरीराची उठण्या-बसण्याची पद्धत योग्य नसेल तर मणक्‍याच्या हाडाची संरचना बदलते आणि यामुळे कंबरेच्या खालच्या भागात, मानेमध्ये वेदना सुरू होतात. कंबरदुखीपासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास नेहमी कंबर सरळ आणि मागच्या बाजूला करून बसावे. शरीराचा भार दोन्ही हिप्सवर बरोबर असला पाहिजे.

दर थोड्या थोड्या वेळाने आपली बसण्याची स्थिती बदलली पाहिजे. खुर्चीवर बसल्यानंतर दोन्ही पाय जमिनीवर सरळ करावेत. उभे राहताना छातीबाहेर आणि पोट आतल्या बाजूला असावे. कंबर सरळ आणि गुडघे वाकलेले नसावेत. दीर्घकाळ एकाच स्थितीत उभे राहणे टाळावे. आपली उभे राहण्याची आणि बसण्याची पद्धत योग्य असेल आणि शारीरिकदृष्ट्या आपण योग्य प्रकारे सक्रिय असू तर कंबरदुखीची समस्या नक्कीच दूर राखता येते.

आणि रोजच्या जीवनक्रमातील ही एवढी काऴजी जर घेतली, तर कंबरदुखी जवळपास फिरकणारही नाही. मग डॉक्‍टरकडे जाण्याचे नावच नको. “अ स्टिच इन टाईम’ ही म्हण माहीत आहे ना? तसाच प्रकार. आपल्याला त्रास होऊ शकेल अशा सवयी-बसण्याउठण्याच्या, हालचालींच्या, चालण्याच्या आणि अर्थातच खाण्यापिण्याच्याही व्यवस्थित ठेवल्या तर दुखणी आपल्या वाटेला जाणारच नाही. पण मोह आणि आऴस या आपल्या दोन सवयी बराच घोटाळा करतात, हे तुम्ही अगदी मोकळेपणाने मान्य कराल. नंतर काळजी करण्यापेक्षा वेळेवर काळजी घ्यावी हे सर्वात उत्तम.

अनुराधा पवार

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×