मोहोळसह 200 जणांवर गुन्हा दाखल
पुणे – नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून सुटल्यावर शक्तिप्रदर्शन करत मिरवणूक काढून पुण्यात दिमाखात येणाऱ्या गजानन उर्फ गजा मारणे यास साथीदारांचे प्रेम महागात पडले. यात त्याच्यासह 9 जणांना अटक करण्यात आली असून आणखी 27 नावे निष्पन्न झाली आहेत. तर 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारागृहातून सुटताच जंगी स्वागत करून रॅली काढत भाईपणावर शिक्कामोर्तब करण्याची प्रथा गेल्या काही दिवसांपासून वाढली. यामुळे होणाऱ्या गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाला पोलिसांनी या कारवाईने चाप लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे मानले जाते. मारणेला दोन खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले. त्याची सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून सुटका केली.
त्याच्या समर्थकांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत फटाके फोडत, ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन 400 ते 500 मोटारींसह जंगी मिरवणूक काढली. याची सोशल मीडियात क्लीप व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दखल घेत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गजा मारणेसह इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही तासातच पुणे पोलिसांनीही त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
मारणे कारागृहातून सुटून बाहेर आल्याने त्याने व त्याचे इतर साथीदार यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरून सोमवारी रात्री कोथरुडला आल्यावर सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणायासाठी बेकायदा जमाव जमवून फटाके वाजवून मोठमोठ्याने आरडाओरड करत दहशतीचे वातावरण निर्माण केले. पोलिसांनी या प्रकरणी मारणेसह साथीदारांवर गुन्हा दाखल केला.
मारणेच्या समर्थनार्थ आलेल्या सर्व वाहनचालक द्रुतगती महामार्गावर टोलनाक्यावर टोल न भरताच वेगाने मुंबईकडून पुण्याचे दिशेने कोथरुड या मारणेच्या निवासस्थानी रवाना झाले. मारणेच्या हजारो समर्थकांनी जंगी स्वागताचे स्टेटस व्हॉटसअपवर ठेवत महाराष्ट्राचा किंग असा उल्लेख करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील सराईत गुंड शरद मोहोळ हासुध्दा कारागृहा बाहेर आलेला असून पुण्यात गुंडा मध्ये पुन्हा वर्चस्वाची लढाई होण्याची शक्यता आहे. तर मारणेचा प्रतिस्पर्धी नीलेश घायवळही कारागृहाबाहेर आहे.
फवारणी तर होणारच
शहरात एकापाठोपाठ एक गुंड जामिनावर किंवा निर्दोष सुटत कारागृहाबाहेर आले आहेत. यामुळे शहरात पुन्हा टोळीयुध्द सुरु होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी सूचक वक्तव्य केले की, मच्छरांची संख्या वाढल्यावर जसा आपण फवारणीचा डोस वाढवतो तसेच काही आता पुणे पोलीस करणार आहेत.
मोहोळलाही शक्तिप्रदर्शन नडले
गुंड शरद मोहोळही कारागृहातून सुटल्यावर त्याच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले होते. तसेच त्याने खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यासंदर्भात त्याच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल केला.