पूर्वा वळसे-पाटील : कळंब-रांजणी गटाचा गावभेट दौरा
मंचर – भराडी गाव आणि वळसे पाटील परिवाराचे जुने ऋणानुबंध आहेत. आजोबा कै. माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील तेथील ग्रामस्थांच्या सुख-दुःखात नेहमीच सहभागी असायचे. त्यामुळे भराडी ग्रामस्थांचे असणारे प्रेम वळसे पाटील कुटुंबीय कधीही विसरणार नाही. भराडीकरांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा महाआघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना भरभक्कम साथ द्यावी, त्या माध्यमातून विकासाला गतीमान करूया, असे आवाहन पूर्वा वळसे पाटील यांनी केले.
पूर्वा वळसे पाटील यांचा कळंब-रांजणी जिल्हा परिषद गटाचा गावभेट दौरा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी भराडी गावात जाऊन भराड माऊलींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक उत्तमराव थोरात, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रमेश खिलारी, उद्योजक गोविंद खिलारी, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नीलेश थोरात, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजय आवटे, अंकीत जाधव, सुरेश खिलारी, गणेश यादव, जे. डी. टेमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते. पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या की, आंबेगाव तालुक्यात वीज, पाणी रस्ते व शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने खऱ्या अर्थाने आंबेगावच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात देखील या परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना सातव्यांदा मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवून सप्तरंगी विजयाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
“महाविजयानंतरच चप्पल घालणार’
भराडी येथे उमेदवार दिलीप वळसे यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरा झाल्यानंतर चप्पल घालण्यासाठी देवदत्त निकम मंदिराच्या सभागृहाबाहेर आले. त्यावेळी चप्पल चोरीला गेल्याचे समजल्यावर नवीन चप्पल आणण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली; परंतु वळसे पाटील यांचा महाविजय झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तोपर्यंत वळसे पाटील यांनी तालुक्यात केलेली विकासकामे ही अनवाणी पायांनीच फिरून पोहोचविणार आहे आणि विजयाच्या दिवशी चप्पल घातली जाईल, असे देवदत्त निकम यांनी जाहीर केले.