Nagpur News – येथील कळमना परिसरात एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. एका अल्पवयीन मुलीला आयफोन गिफ्ट देण्यासाठी तिचा प्रियकर घरफोड्या करत असल्याचे समोर आले आहे. कळमना पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याचा भाऊ दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर आधीच 7-8 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीशी गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या आरोपीने, तिच्या आयफोनच्या मागणीसाठी भावासोबत मिळून कामना नगर येथे एका घरातून 1 लाख 44 हजार रुपयांची रोकड चोरली.
चोरीतील रक्कमेतून त्याने प्रेयसीसाठी सौंदर्यप्रसाधने आणि महागडे कपडे खरेदी केले. मात्र, आयफोन खरेदीसाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने अनेक घरफोड्या केल्या. बुधवारी पहाटे गस्त घालणाऱ्या पोलिसांना संशयास्पद वागणूक दिसल्याने दोन्ही विधीसंघर्षग्रस्त भावांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.