कापूरहोळ – आढले बुद्रुक (ता. मावळ) येथून हरविलेली 11 वर्षीय चिमुकली राजगड पोलिसांना रहाटवडे (ता. हवेली) येथे सोमवारी (दि. 15) रात्री 10च्या सुमारास गस्तीवर असताना दिसून आली. भेदरलेल्या अवस्थेतील मुलीला पोलिसांनी 24 तासांच्या आत घरी सुखरूप पोहोचविले आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री रहाटवडे येथे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना सगुणा यशवंत जाधव (रा. आढले बुद्रुक, ता. मावळ) भेदरलेल्या अवस्थेत दिसून आली. विचारपूस केली असता तिला मराठी बोलता येत नसल्याचे पोलिसांना समजले. ती कातकरी समाजाची भाषा बोलत असल्यामुळे ती काय बोलत आहे हे जाणून घेण्यासाठी चेलाडी येथील कातकरी समाजातील जाणकारांकडून माहिती घेतली. त्यानंतर सगुणाला तिचे वडील यशवंत तुळशीराम जाधव व आई हिराबाई जाधव यांच्याकडे सुखरूप दिले.
सदर कामगिरीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस नाईक सादिक इनामदार, आश्विनी मोरे, प्रशांत वाबळे तसेच दीपक शिवतारे यांनी मोलाची मदत केली.