राष्ट्रवादीच्या हट्टीपणामुळे कॉंग्रेसचे नुकसान

माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचा आरोप

पुणे -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हट्टीपणामुळेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकांच्या तोंडावर पक्ष सोडण्याची वेळ आल्याचा आरोप महाराष्ट्र “इंटक’चे अध्यक्ष व कॉंग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी नगरची जागा सुजय विखे-पाटील यांना सोडली असती, तर कदाचित राज्याच्या राजकारणात वेगळे चित्र असते. पण, त्याही वेळेला राष्ट्रवादी कॉंग्रेसने आडमुठेपणाचे धोरण स्वीकारले. त्याचे दुष्पपरिणाम आता दोन्ही कॉंग्रेसला भोगावे लागत आहेत.

दुर्दैवाने कॉंग्रेस पक्षातील गळती थांबविण्यासाठी समर्थ नेतृत्व राज्यस्तरावर पक्षाकडे नाही. असे जर नेतृत्व असते, तर राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील व पक्षातील अन्य नेत्यांवर अन्याय होऊ दिला नसता. कॉंग्रसेच्या या अवस्थेमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकजुटीने काम करुन हे आव्हान पेलण्याची ही वेळ असताना सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुठलीही सुसूत्रता नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाचे भविष्य खडतर असल्याची चिन्हे आहेत, असे ही छाजेड यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने वेळोवेळी त्याच्या सोयीचे व गांधी घराण्याच्या द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे कॉंग्रेसचे नुकसान झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×