उपळवेतील वांजाळी तलाव फुटून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

फलटण  – वांजाळी तलाव फुटून शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान झाले असून संबंधित ठेकेदाराकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी उपळवे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले. मात्र, फलटण तालुक्‍यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने आपले पशुधन व शेतातील पिके वाचवण्यासाठी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे मागणी केल्याने उपळवे (ता. फलटण) येथील वांजाळी तलावात धोम बलकवडीचे पाणी सोडले होते.

यानंतर वांजळी तलावातून पाणी गळती सुरु झाली होती. याबाबत तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याच्या तक्रारी येथील शेतकऱ्यांनी केल्या होत्या. मात्र, याकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने काल सोमवारी दि. 23 रोजी हा तलाव फुटला. त्यामुळे 100 ते 150 एकर क्षेत्रावर असणाऱ्या बाजरी, मका, ऊस व जनावरांसाठी केलेला चारा वाहून गेला आहे. यामुळे एका बाजूला दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना नऊ महिन्यातच हा तलाव फुटून पाणी वाया गेलेच पण एवढया दुष्काळात वाचवलेली पिके मात्र भुईसपाट झाली. त्या ठिकाणच्या दोन विहिरींचेही नुकसान झाले आहे.

तलावामुळे उपळवे व जाधवनगर या दोन्ही ठिकाणी प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा करून संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थळी दिंगबर आगवणे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.