द्राक्षाचे कोट्यवधींचे नुकसान अन्‌ पीकविमा कुचकामी

संगमनेर  – शासनाकडून मोठा गाजावाजा करत हवामान आधारित फळपीकविमा योजना लागू करण्यात आली. मात्र जाचक अटींमुळे संगमनेर तालुक्‍यातील 144 हेक्‍टरवर द्राक्ष बागायतदारांना नुकसान होऊनही नुकसान भरपाई मिळणार नाही. 31 ऑक्‍टोबरला शासनाने आदेश काढून चालू हंगामासाठी विमा योजना लागू केली आहे. त्यानुसार 8 नोव्हेंबरपासून द्राक्षबागांना विमा संरक्षण लागू होणार आहे. गेल्या आठवडाभरात पावसाने द्राक्षबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊनदेखील, या अटींमुळे द्राक्ष बागायतदारांना कोणताच फायदा होणार नाही. त्यामुळे ही पीकविमा योजना द्राक्ष बागायतदारांसाठी कुचकामी ठरली आहे.

राज्यासह संगमनेर तालुक्‍याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सप्टेबर महिन्यात पीक छाटणी घेतलेल्या सुमारे 144 हेक्‍टरवर द्राक्षबागांना पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात घट होणार आहे.

अनेक द्राक्षबागांचे पूर्णःपणे नुकसान झाले आहे. सुमारे एक एकर द्राक्षबागेसाठी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा घातलेला खर्च वाया गेला आहे, तर या बागेतून सरासरी चार लाख रुपयांचे उत्पन्नही गमवावे लागणार आहे. द्राक्षबागांच्या पीक छाटणीचा हंगाम सप्टेंबरपासून सुरू होतो. हवामानातील बदलांमुळे पिकांचे नुकसान होते. या नुकसानीत शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी राज्य आणि केंद्‍र्र शासनाने हवामानाधारित फळ पीकविमा योजना सुरू केली आहे. प्रत्येकवर्षी शासन आदेश काढून या विमा योजनेची अंमलबजावणी करते.

यावर्षी 31 ऑक्‍टोबरला शासन आदेश काढून विमा योजना जाहीर केली. या योजनेनुसार द्राक्षांसाठी 8 नोव्हेंबर ते 31 मार्च या कालावधीसाठी अवेळी पाऊस, 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीसाठी दैनंदिन कमी तापमानातून होणाऱ्या नुकसानीसाठी एकरी 3 लाख 8 हजार रुपयांची विमासंरक्षित रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तसेच 1 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीसाठी गारपीट नुकसानीसाठी 1 लाख 2 हजार 667 रुपयांची संरक्षित रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या विमा योजनेत बहुतांश द्राक्ष बागायतदार सहभाग घेत आहेत.

मात्र विमा संरक्षण लागू करण्याच्या तारखेच्या खेळामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना कोणताच लाभ मिळणार नाही. अनेक वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून विमा योजना चारमाही कालावधीऐवजी बारमाही कालावधीसाठी लागू करावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र या मागणीला शासनाकडून नेहमीच केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार कंगाल आणि विमा कंपन्या मालामाल, असेच चित्र असून विमा भरूनही द्राक्षबागायतदारांसाठी विमा योजना कुचकामी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.