रवींद्र कदम
एका पोलीस ठाणे हद्दीतून घ्यायचे अन् दुसऱ्या पोलीस ठाणे हद्दीत लुटायचे
नगर – नुकतीच कोतवाली पोलिसांनी प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद केली असून, लुटारूंची प्रवाशांना लुटण्याची नामी शक्कलच पुढे आली आहे. आरोपी प्रवाशांना माळीवाडा परिसरातून वाहनात बसवून दुसऱ्या पोलीस ठाण्याहद्दीत नेवून लुटमार करून त्यांच्याकडील मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेत असे. त्यामुळे लुटमार करणारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात नसे. गेला तर हा गुन्हा संबंधित पोलीस ठाण्याहद्दीत घडला आहे. तुम्ही तिकडे फिर्याद द्या. त्यामुळे तक्रारदारही रात्रीच्या वेळी त्या पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात नसल्याने लुटारूंना सुगीचे दिवस आले होते.
कोतवाली पोलिसांनी कय्युम काझी कुरेशी (वय-23, रा. बाबा बंगाली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, नगर), सद्दाम मोहम्मद आली (वय-23,झेंडीगेट,नगर), मोईन बादशहा शेख (वय-20, बुरुडगाव रोड,भोसले आखाडा, नगर), सुसेफ नासीर शेख (वय-20, मुकुंद नगर) चौघांना ताब्यात घेतले आहे. हे माळीवाडा बसस्थानका बाहेरून प्रवाशांना खासगी वाहनात बसवून राहुरी फॅक्टरी, विळद घाट, पांढरीपूल परिसरात नेवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने, मोबाइल, पैसे लुटमार करून त्यांना दुसऱ्या पोलीस ठाण्याहद्दीत सोडून देत असे.
त्यामुळे हे प्रवाशी रात्री अपरात्री आडमार्गे सोडून दिल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात नसे. गेली तरी जवळील पोलीस ठाण्यात तर हा गुन्हा संबंधित पोलीस ठाण्याहद्दीत घडला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तक्रार द्या. असे सांगत असे. त्यामुळे आधीच लुटारूंनी जवळील ऐवज चोरून नेल्याने कोणत्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यायची त्यामुळे ह्या सगळ्या लफड्यापासून दूरच बरे असे म्हणून कोणीही तक्रार दाखल करत नसे. त्यामुळे लुटारूंचा ही आत्मविश्वास वाढत गेला. अन एका मागे एक प्रवाशांना लुटण्याचे सत्र सुरुच ठेवले.
एक प्रवाशी शुक्रवारी (दि.21) रोजी माळीवाडा परिसरात राहुरी फॅक्टरीकडे जाण्यासाठी थांबला असता. नेहमीप्रमाणे लुटारूंचे वाहन तेथे आले. राहुरी फॅक्टरी येथे सोडतो म्हणून संबंधित तरूणाला वाहनात बसविले. राहुरी फॅक्टरीकडे न जाता डीएसपी चौकातून मिरावली पाहाडाकडे वाहन वळविले. तिकडे आमचे घर असून थोडे काम आहे. त्यानंतर तुम्हाला राहुरी फॅक्टरीला सोडतो म्हणून आडमार्गे नेवून प्रवाशाला लुटले. व तेथेच सोडून दिले. त्यानंतर संबंधित प्रवाशाने घडलेला प्रकार कोतवाली पोलीस पोलिसांना सांगितला.
त्यानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपींची शोध मोहीम सुरु केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांनी आरोपींचा शोध घेवून चौघे आरोपी जेरबंद केले. त्यानुसार गुन्ह्याचा उलगडा झाला असून त्यांच्याकडून 11 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. त्यामुळे लुटारूंचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यत कोतवाली पोलिसांकडून व्यक्त होत आहे.