डोक्‍यावर साकारले बाप्पांचे रूप

सातारा – बुद्धीची देवता म्हणून श्री गणरायाची भक्ती भावाने पूजाअर्चा केली जाते. गणेश चतुर्थीला हिंदू बांधवांनी श्री गणरायाची प्राण प्रतिष्ठापना केली आहे. साताऱ्यात एका भाविकाने चक्क डोक्‍यावर गणरायाच्या आकाराची मूर्ती कोरून घेतली आहे.

सदरबझार येथील सार्थक केसकर्तनालयातील कलावंत महेश पांडुरंग पवार यांनी तब्बल दीड तास एकाग्रतेने विशाल पवार या भाविकाच्या डोक्‍यावरील केसाला आकार देऊन लहान श्री गणरायाचे कोरीव काम केले आहे. मशीन व वस्ताऱ्याच्या सहाय्याने या पूर्वी आई, बॅटमॅन, वर्ल्ड कप चिन्ह व विविध प्रकारचे आकार हौशी युवकांच्या डोक्‍यावर कोरले आहेत. कारगाव (ता. पाटण) येथून उपजीविकेसाठी आलेल्या पवार कुटुंबियांनी सातारा शहर ही आपली कर्मभूमी मानली. बारा वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीला केसकर्तनालय दुकानाला सुरुवात करताना पवार यांनी स्वतःच्या बंधूंच्या डोक्‍यावर श्री गणराय कोरले होते. तेव्हापासून श्री गणराय नवसाला पावतो अशी त्यांची धारणा झाली आहे. सामाजिक कार्यातही ते सहभागी होतात.

सातारा जिल्ह्यातील वाईचा ढोल्या गणपती, खिंडीतील गणपती, अंगापूर (ता. सातारा), गणपतीचा माळ (ता. जावळी), सोळशी (ता. कोरेगाव), मसूर (ता. कराड) असे अनेक ठिकाणी गणरायाची आख्यायिका सांगितली जाते. आता युवा पिढी डोक्‍यावर गणरायाची मूर्ती कोरून घेत आहेत. भविष्यात त्याची ही चर्चा होणार असली तरी श्री गणराय या बुद्धीच्या देवाचा अंतर्भाव हा बाह्य स्वरूपात न करता अंतर्गत होणे गरजेचे आहे असे भाविकांनी सांगितले. सध्या युवा वर्गाला अशा प्रकारच्या भक्तीचे आकर्षण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.