पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उद्योग व्यवसायावर परिणाम होणार नाही, या पद्धतीने प्रतिबंधित क्षेत्र ठरवावे. तसेच सुक्ष्म नियोजन करुन ज्या भागात आवश्यकता आहे, तेथेच सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, महसूल व अन्य विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आज जिल्हाधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.जिल्ह्यात सर्वांत जास्त हवेली तालुक्यात करोना बाधित आहेत. येथील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, चाकण, तळेगाव, हिंजवडी आदी औद्योगिक क्षेत्रांच्या कामावर टाळेबंदीमुळे परिणाम होऊ नये, याचीही काळजी घ्यावी.
करोना प्रतिबंधासाठी जुन्नर तालुक्यात सर्व यंत्रणांच्या समन्वयाने उत्तम नियोजन केले आहे. त्या धर्तीवर अन्य तालुक्यांत देखील विविध विभागांच्या मदतीने सूक्ष्म नियोजन करुन त्याप्रमाणे कार्यवाही करावी. महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रियादेखील पूर्ण करावी. यात आरोग्याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.