नागरिकांच्या तत्परतेने वाचले जखमी युवकांचे प्राण

  •  होमगार्डने केले रुग्णवाहिकेचे सारथ्य

सांगवी – वेळ रविवारी रात्री साडेआठची… ठिकाण पिंपळे गुरव परिसरातील 60 फुटी रोड… मशिदीसमोर एका दुचाकीस्वार युवकाच्या गाडीला अपघात होऊन युवक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला… संचारबंदीमुळे रस्त्यावर कोणीही नव्हते. अपघाताची माहिती राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल व तानाजी जवळकर यांना मिळाली… 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करूनही तब्बल अर्धा तास झाले तरी रुग्णवाहिका येत नाही… दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचतात. तेवढ्यात सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर यांच्या रुग्णवाहिकेचे पोलीस होमगार्ड स्वतः सारथ्य करीत जखमी युवकांना वायसीएम रुग्णालयात दाखल करतात… जखमी युवकांचा जीव वाचतो..

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळे गुरवमधील साठफुटी रस्त्यावरील मशिदीनजीक दोन युवक दुचाकीला अपघात होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. करोनामुळे संचारबंदी असल्याने रस्ता सुनसान होता. त्यामुळे मदतीअभावी ते तरुण तसेच पडून होते. डोक्‍यातून रक्‍तस्राव सुरू होता.
अपघाताची माहिती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते अमरसिंग आदियाल आणि तानाजी जवळकर यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत 108 क्रमांकावर संपर्क साधत रुग्णवाहिकेची मदत मागितली. मात्र, खूप वेळ होऊनही रुग्णवाहिका आली नाही. दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. तानाजी जवळकर यांची रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली. ही रुग्णवाहिका पोलिसांच्या स्वाधीन केली.

कर्तव्यदक्ष होमगार्ड दत्तात्रय गायकवाड यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत या गंभीर जखमी तरुणांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तानाजी जवळकर व अमरसिंग आदियाल यांनी रुग्णालयात पोहचविण्यासाठी यंत्रणा कामी लावली. यामुळे युवकाला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले, सध्यातरी त्याच्या जिवाचा धोका टळला आहे.

तानाजी जवळकर अनेक वर्षे ही रुग्णवाहिका सेवा परिसरातील नागरिकांना पुरवत आहेत. नि:शुल्क रुग्णवाहिका सेवेमुळे आजपर्यंत अनेकांचे जीव वाचले आहेत. आज पुन्हा एकदा त्यांच्या या आरोग्यसेवेचा प्रत्यय आला. तरुणाचे प्राण वाचविण्यासाठी अमरसिंह आदियाल व तानाजी जवळकर यांनी दाखवलेले प्रसंगवधान या तरुणासाठी खरे देवदूत ठरले. कर्तव्यदक्ष होमगार्ड दत्तात्रय गायकवाड यांच्यासह सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सूरज भोजने, अनिल देवकर, होमगार्ड प्रल्हाद शेलार आदी यावेळी कर्तव्यावर होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.