मंत्री आणि सत्ताधारी सदस्यांतच शाब्दिक चकमक

नवी दिल्ली – लोकसभेत आज सत्ताधारी सदस्य आणि मंत्र्यांमध्येच शाब्दिक चकमक झाल्याचे पहायला मिळाले. प्रश्‍नोत्तराच्या तासात बीएसएनएलच्या कामाविषयी चर्चा सुरू असताना दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की नैसर्गिक आपत्तीच्या काळात संबंधीत विभागात बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांमार्फत मोफत दूरध्वनी सेवा पुरवली जाते. त्यावेळी त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत भाजपचेच राजीवप्रताप रूडी म्हणाले की खासगी दूरसंचारकंपन्याही अशी सेवा त्या भागात पुरवत असतात.

त्यांच्या या दाव्याला प्रत्त्युत्तर देताना रविशंकर प्रसाद म्हणाले की खासगी कंपन्या केवळ एकदोन दिवस अशी सेवा देतात पण सरकारी दूरसंचार कंपन्या मात्र नैसर्गिक आपत्तीचे पुर्ण निवारण होईपर्यंत अशी सेवा देतात. त्यानंतर रूडी यांनी सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या कॉल ड्रॉपचा विषय उपस्थित केला आणि त्यासाठीही सरकारी कंपन्या ग्राहकांना पैसे लावतात असा आरोप केला. जेव्हा सरकारी दूरसंचार सेवेतून नागरीकांना चांगली फोन सेवा मिळत नाही तेव्हा नागरीक सरकारच्या नावाने शंख करतात असे रूडी यांनी नमूद केले.

त्यावर उत्तर देताना रविशंकर प्रसाद म्हणाले की सरकारी दूरसंचार सेवा चांगली चालण्यासाठी त्यांचे आर्थिक आरोग्यही चांगले असणे अपेक्षित असते. सत्ताधाऱ्यांमधील या शाब्दिक चकमकीने सभागृहाचे काहीं काळ मनोरंजन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.