मुंबई – राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर यांच्या उपस्थितीत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर सुनावणी झाली. त्यात ही यादी राज्यपालांकडेच असल्याची बाब उघड झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली होती. ही यादी राज्यपालांना सुपूर्द करून आता 7 महिने उलटले तरीही त्यांनी अद्याप नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला आहे.
त्यानंतर या 12 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपालांकडे नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारात देण्यात आली होती. यादी राज्यपालांकडे नाही तर नेमकी कोणाकडे आहे, असा सवाल करत अनिल गलगली यांनी आव्हान दिले होते. त्यावर आज (15 जून) राजभवन सचिवालयात उपसचिव प्राची जांभेकर यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली.
या सुनावणीत संबंधित यादी राज्यपालांनी स्वतःकडे ठेवली असल्याचे सांगण्यात आले आहे. आता राज्यपालांनी यावर काही निर्णय घेतल्यावरच याची माहिती देता येउ शकणार आहे. दरम्यान, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर माहिती दिली जाऊ शकते की नाही याचाही सल्ला घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.