बंद ट्रान्सफॉर्मरला दारूचा नैवेद्य दाखवला अन्…

पटना – देशातील एक महत्त्वाचे राज्य असलेल्या बिहारमध्ये सध्या शंभर टक्के दारूबंदी आहे तरीसुद्धा राज्यातील सारण जिल्ह्यातील एका गावामध्ये विद्युत मंडळाचा ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यासाठी चक्क दारूचा नैवेद्य दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे खळबळ माजली आहे.

सारण जिल्ह्यातील सलेमपुर पोखरा नावाच्या गावामध्ये गेले कित्येक दिवस हा ट्रान्सफार्मर बंद असल्यामुळे गावातील लोकांना विजेचा पुरवठा होत नव्हता हा ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यासाठी सर्व तांत्रिक आणि अभियांत्रिकी प्रयोग करण्यात आले तरीसुद्धा या ट्रांसफार्मरचे काम सुरू न झाल्याने गावातील नागरिकांनी एक वेगळाच कार्यक्रम केला या ट्रान्सफॉर्मर समोर विविध प्रकारचे नैवेद्य आणून ठेवण्यात आले सर्व प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ या ट्रांसफार्मर समोर आणून नैवेद्य दाखवण्यात आले फुले अर्पण करून अगरबत्तीही लावण्यात पूजा करण्यात आली तरीही हा ट्रांसफार्मर सुरू झाला नसल्याने अखेर राज्य विद्युत मंडळाच्या दोन कर्मचाऱ्यांनीच या ट्रांसफार्मर ला दारूचा नैवेद्य दाखवला. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या ट्रांसफार्मर समोर दारूचा नैवेद्य दाखवल्यानंतर वीजपुरवठा सुरू झाला या घटनेची चर्चा होताच गावातीलच एका वकिलाने अंधश्रद्धा पसरवली म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी राज्य विद्युत मंडळाच्या या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. 

हे दोन्हीही कामगार रोजंदारीवर काम करणारे होते त्यांचा विद्युत मंडळाशी थेट संबंध नव्हता तरीहि या दोन कामगारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना त्यांच्या सेवेतून लगेच मुक्त करण्यात आले आहे.

ट्रान्सफॉर्मर चे काम संपूर्णपणे तांत्रिक पद्धतीने सुरू झाले असून त्याचा या सर्व विधीशी कोणताही संबंध नाही असा खुलासा लगेचच राज्य विद्युत मंडळातर्फे करण्यात आला आहे. आणि या गावातील हा ट्रांसफार्मर यापुढेही व्यवस्थित सुरू राहील आणि गावातील नागरिकांना व्यवस्थित वीज पुरवठा करता येईल अशी ग्वाहीही वीज मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.