खासगी प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता : प्रवासात महिला-मुलींची संख्या लक्षणीय
कुरकुंभ – येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक मोठ्या कंपन्या असल्याने या ठिकाणी कामगारांची संख्या लक्षणीय आहे. दौंड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कामगार या ठिकाणी कामाला येत असतात. मात्र, कंत्राटी पद्धतीने काम करणारे कामगार औद्योगिक वसाहतीकडे रोजगारासाठी खासगी गाड्यातून प्रवास करीत आहेत. अशा खासगी गाड्यातून प्रवास करणाऱ्या कामगारांचे जीव टांगणीला असल्याचे चित्र या भागात दिसत आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांमध्ये मुली, महिला यांची संख्या बऱ्यापैकी आहे.बऱ्याचदा कंत्राटी कामगारांना कंपनीमध्ये येण्यासाठी कंपनीकडून कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही.
पर्यायी शेजारील गावांतून एमआयडीसीमध्ये येण्यासाठी खासगी वाहनाचा वापर केला जातो. या वाहनांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त कामगार बसवून प्रवास होताना दिसत आहे. यामध्ये मुली आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे. काही कंपन्यांमध्ये तालुक्याच्या ठिकाणाहून, तसेच शेजारील इतर गावांतून या ठिकाणी काम करण्यास महिला येतात. मात्र, एमआयडीसीमध्ये येण्यास इतर वाहन उपलब्ध होत नसल्याने त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून अशी वाहुतक रोज सर्रासपणे होत आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये महिला व मुली मोठ्या प्रमाणात कामासाठी आहेत. बऱ्याच वेळा कंपनीमधून उशिरा सुटी झाल्याने पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने या महिला चालत जातात, त्यामुळे येथील कामगार महिलांची सुरक्षितता लक्षात घेता महिलांना येण्या-जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे.
रेश्मा शितोळे, पोलीस पाटील, कुरकुंभ