पालिकेच्या पथ विभागाचा प्रकार
शहरात सुरू आहे राजरोस प्रकार
पुणे –रस्त्यावरील खचलेल्या चेंबरमुळे झालेला खड्डा दुरुस्त करण्याच्या नावाखाली महापालिकेच्या पथ विभागाने डांबर आणि खडीने चेंबरचे झाकणच कायमस्वरूपी बंद केले आहे. “पीएमसी केअर’ या तक्रारनिवारण प्रणालीच्या तक्रारीनंतर हा प्रकार झाल्याचे समोर आले. तर, शहरात अनेक ठिकाणी हे प्रकार राजरोसपने सुरू असून त्यामुळे पावसाळ्यात या चेंबरची सफाई कशी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, या तक्रारीमुळे पालिकेच्या कामाचा आणखी एक नमुना समोर आला आहे.
महिन्याभरापूर्वी शिवाजीनगर पोलीस चौकीसमोर असलेले चेंबरचे झाकण खचले होते. त्यामुळे झाकणाच्या बाजूला खड्डा तयार झाला होता. हा खड्डा वर्दळीच्या रस्त्यावर असल्याने सीटीआय संस्थेचे संजय शितोळे यांनी याबाबत महापालिकेच्या पीएमसी केअर या तक्रार नियंत्रण प्रणालीवर खड्ड्याची माहिती दिली. त्यानंतर पथ विभागाकडून खड्डा दुरुस्त करण्याऐवजी संपूर्ण चेंबरचे झाकणच बुजवून टाकले. त्यामुळे या चेंबरची साफसफाई पावसाळ्यात करायची झाल्यास ते उखडूनच काढावे लागणार आहे. दरम्यान, तक्रारीमुळे हा प्रकार समोर आला असला तरी, शहरात बहुतांश ठिकाणी रस्त्यांवरील चेंबरच्या बाजूचे खड्डे न बुजविता चेंबरची झाकणेच डांबर टाकून बुजवली आहे. अशा प्रकारच्या कामामुळे भविष्यात चेंबर सफाई न झाल्यास पूरस्थितीचा सामना करावा लागणार आहे.