राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला

पुणे – राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणार पावसाचा जोर गुरुवारी काहीसा कमी झाला. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ वगळता राज्यात हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

राज्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून असणारा त्याचा जोर आता कमी झाला आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. हे क्षेत्र मान्सूनचा आस असलेल्या कक्षेत आल्याने राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस सुरू झाला होता. परंतु, इतर भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचदरम्यान अरबी समुद्रात चक्रावात निर्माण झाल्याने राज्यात सर्वत्र ढगाची गर्दी झाली होती. त्यामुळे बुधवारी राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला, पण आता अरबी समुद्रात निर्माण झालेला चक्रावात हा गुजरातकडे सरकला आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पावसाचा जोर कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अद्याप सक्रिय असल्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत जोर वाढणार आहे. दरम्यान गुरुवारी पुण्यातही पावसाने विश्रांती घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.