करमाळा : नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी चिखलठाणात 5 एकर उभा ऊस पेटवला…पण

पण, वन अधिकाऱ्यांसमोरूनच बिबट्या पळून गेला...

जामखेड (प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे ऊसतोडणी मजुराच्या आठ वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी वन विभागाने आदेश काढले असुन बिबट्या लपवून बसलेल्या चिखलठाण येथील शेतातील उभा ऊस पेटून दिला मात्र वन अधिकाऱ्यांसमोरूनच हा बिबट्या पळून गेला आहे.

ऊसतोड कामगारांची मुलगी फुलाबाई हरिचंद कोटले (वय 8) ही मुलगी या हल्ल्यात मृत झाली आहे. सोमवारी (ता. 7) सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. या घटनेची माहीती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी चिखलठाण येथे दाखल झाले.

दुपारी 12 वाजल्यापासून वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी बिबट्याचा शोध घेतला. या घटनेची माहिती मिळताच आमदार संजय शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, तहसीलदार समीर माने, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे या ठिकाणी दाखल झाले.

पेटवून दिलेला पाच एकर ऊस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांचा आहे. उसाच्या तिन्ही बाजूने आग लावण्यात आली असून, एका बाजूला बिबट्याला पकडण्यासाठी वाघर लावण्यात आली आहे. उसाच्या चारही बाजूने शार्प शूटर तैनात होते. तरीही ऊस पेटवताच बाजूला असलेल्या केळीच्या पिकातून शेटफळ गावच्या दिशेने बिबट्या पसार झाला आहे.

या वेळी सहाय्यक वन संरक्षक संजय कडू, सहाय्यक वन संरक्षक बाळासाहेब हाके यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय बिबट्याला बेशुद्ध करणारी तीन बेशुद्ध पथके तैनात होती. शिवाय ड्रोन कॅमेरे, बंदूकधारी कर्मचारी उपस्थित असतानाही बिबट्या पळाल्याने ग्रामस्थांमधून वन विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.