सावकारांची दिवाळी, कर्जदारांचा शिमगा

मार्च अखेरमुळे बॅंका, संस्थांचा सुरू झालायं वसुलीसाठी तगादा

नागठाणे – मार्च अखेर असल्यामुळे बॅंकांसह खासगी संस्था, पतसंस्थांनी कर्जदारांकडे वसुलीसाठी तगादा सुरु केला आहे. त्यामुळे जेरीस आलेल्या कर्जदारांकडून अवेळी पैसे उभे करण्यासाठी खासगी सावकारकीचा आधार घ्यावा लागत असल्याने सावकरांची दिवाळी तर कर्जदारांचा शिमगा असे म्हणण्याची वेळ निर्माण झाली आहे. माणसाला अडचणीतून सुटका करवून घेण्यासाठी अनेकांपुढे हात पसरावे लागतात. गरजेला पैसा उपलब्ध व्हावा म्हणून गरजवंत खाजगी सावकारांच्या वळचणीला जाऊ लागतो.

एकीकडे बॅंका वार्षिक 9 ते 14 टक्के व्याजाने कर्ज देत असताना ते परत फिरवण्यासाठी मार्च महिन्याच्या तोंडावर तात्पुरत्या उलाढालीसाठी लोक खाजगी सावकारांकडे हात पसरताना दिसत असून या खाजगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याज आकारले जात आहे. यामुळे सावकारांची दिवाळी अन्‌ कर्जदारांचा खऱ्या अर्थाने शिमगा पाहायला मिळत आहे.

सध्या मार्च अखेरची धूम असल्याने व्यापारी वर्गाबरोबर शेतकऱ्यांचीही मार्च अखेरच्या तोंडावर विविध बॅंका, वित्तीय संस्था यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची फिरवाफिरवी करताना दिसत आहेत. तर काही बॅंका वसुलीची मोहीम राबवत आहेत. त्यासाठी कर्जदारांचे उंबरठे बॅंका झिजवत आहेत. या बॅंकांच्या ससेमिरीने कर्जदार पुरता जेरीस आला असून बॅंकांच्या या वसुली मोहिमेस रशेतकरी मिळेल तिथून पैसा उपलब्ध करताना दिसत आहेत. वेळप्रसंगी थोड्या दिवसांसाठी काहीजण अवैध खाजगी सावकारांच्याकडे हात पसरत असल्याचे दिसत आहेत.

खाजगी सावकार ही या महिन्यात फिरवा फिरवीसाठी लाखो रुपये गुंतवत आहेत. या तात्पुरत्या स्वरूपात चालणाऱ्या खाजगी सावकारीतून म्हणेल तेवढी व्याज आकारणी केली जात आहे. काही सावकारांचे ठिकठिकाणांच्या बॅंकेत, वित्तीय संस्थांमधून असणाऱ्या वसुली कर्मचाऱ्यांच्याबरोबर साटेलोटे असून त्यांच्याकडूनही कर्मचारीच काही कर्जदारांना खाजगी सावकारांकडे घेऊन जात आहेत तर काही वित्तीय संस्थांचे पदाधिकारी ही या सावकारीत गुंतलेले दिसत आहेत. तर काही महिलादेखील बचत गटांच्या माध्यमातून लाखो रुपये या तात्पुरत्या चालणाऱ्या खाजगी सावकारीत गुंतवत आहेत. यातून बचत गट चालवणाऱ्या महिला स्वतःचे उखळ पांढरे करुन घेत आहेत.
या तात्पुरत्या चालणाऱ्या सावकारीतून थोड्याच दिवसात परतावा मिळत असून यातून मोठ्या प्रमाणात व्याज मिळत असते शिवाय बॅंकांचे कर्मचारी हातात असल्याने कर्ज बुडण्याची शक्‍यता नसते. पुढील कर्जातुन व्याज व मुद्दल दोंन्ही मिळेल इतका पुन्हा अर्थ पुरवठा या संस्था करत असतात. यातूनच कर्जदार पुरता डबघाईला येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)