विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी आ. शंभूराज देसाई

कोयनानगर – महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित झालेले शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद पाटणचे लोकप्रिय व विधानसभेतील अभ्यासू आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमदार शंभूराज देसाई यांची महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी या पंचवार्षिकमध्ये तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये आमदार शंभूराज देसाईंची तालिकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांनी दि.25 फेब्रुवारी,2019 रोजी विधानसभा सभागृहात केली आहे. महाराष्ट्र विधानसभा हे लोकशाहीचे महामंदीर असून राज्यातील सर्वोच्च असे सभागृह आहे. या सभागृहात अधिवेशन काळात विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हे महाराष्ट्र विधानसभा नियम 8 अन्वये विधानसभेच्या सदस्यांमधून सभाध्यक्ष तालिकेवर विविध पक्षाच्या विधानसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.

शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार उत्कृष्ट संसदपटु शंभूराज देसाई यांचे विधानसभेतील कामकाज पाहून त्यांची महाराष्ट्र विधानमंडळाने सन 2014 ते 2019 या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या तालिकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा नियुक्ती केली आहे.सन 2016 चे पावसाळी अधिवेशन, 2018 ला अर्थसंकल्पीय अधिवेशन व सध्या सुरु असलेले फेब्रुवारीचे अधिवेशन अशा तीन अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून बसण्याचा बहूमान मिळाला आहे. आमदार शंभूराज देसाई यांना तिसऱ्यांदा तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

राजे, तुम्हाला पाहून स्व.बाळासाहेब देसाई यांची आठवण येते

तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर सभागृहात उपस्थित असणाऱ्या विविध पक्षाचे विधानसभा सदस्य अभिमानाने सांगतात. राजे, तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेले पाहून महाराष्ट्राला दिशा देणारे तुमचे आजोबा स्व.बाळासाहेब देसाई यांची काहीकाळ आम्हाला आठवण येते.यामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षातीलही विधानसभा सदस्यांचा समावेश असतो. ही अभिमानास्पद बाब आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.