मस्कत – लेजंड्स लीग क्रिकेट स्पर्धा सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड जायंट्स संघाने जिंकली. त्यांनी अंतिम फेरीत आशिया लायन्स संघाचा 25 धावांनी पराभव केला व विजेतेपदाला गवसणी घातली.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वर्ल्ड जायंट्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 256 धावा केल्या. आशिया लायन्सचा डाव 20 षटकांत 8 बाद 231 धावांवर रोखला गेला. आशिया लायन्सकडून महंमद युसूफने सर्वाधिक नाबाद 39 धावा केल्या. त्याचवेळी वर्ल्ड जायंट्सच्या अल्बी मॉर्केलने 35 धावांत 3 गडी बाद केले.
अंतिम लढतीत जायंट्सच्या केवीन पीटरसनने तिसऱ्या षटकातच शोएब अख्तरला तीन षटकार ठोकले. पीटरसनने 22 चेंडूत 5 षटकारांसह 48 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोरी अँडरसनने पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार फटकावताना 25 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. आपले आक्रमक धोरण कायम राखत कौरी अँडरसनने 43 चेंडूत 8 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 93 धावा केल्या. कर्णधार सॅमीनेही शेवटच्या षटकात जायंट्ससाठी 38 धावा करत संघाला 256 धावांपर्यंत नेले.
प्रत्युत्तरात आशिया लायन्सच्या सनथ जयसूर्याने 38, तर महंमद युसूफने नाबाद 39 धावा केल्या. मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही.