जर्मनीतील शेतकऱ्यांकडून जुन्नर बाजार समितीचे कौतुक
नारायणगाव – ग्रीन इनोव्हेशनचे काम पंधरा देशांमध्ये सुरू आहे; मात्र भारत देशातील शेती व घेतले जाणारे उत्पादन हे अन्य देशांपेक्षा अधिक चांगले व लोकाभिमुख आहे. भारतातील कृषी मार्केट हे अग्रेसर आहे. नारायणगाव येथील उपबाजार केंद्रात शेतकरी ते व्यापारी थेट खरेदी-विक्री ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. मार्च ते सप्टेंबर कालावधीत टोमॅटो मार्केट सुरू असते. या कालावधीमध्ये प्रत्यक्ष येऊन टोमॅटो खरेदी-विक्री लिलाव पद्धत पाहण्यासाठी पुन्हा येऊ, असे आश्वासन जर्मनी येथील बीएमझेड या कंपनीचे हेड ऑफ डिव्हीजन सॅबस्टीयन लेचेस
यांनी दिले.
नारायणगाव येथील उपबाजार केंद्राला सोमवारी (दि. 11) जर्मनी येथील जी. आय. झेड इंडियाचे कंन्ट्री डायरेक्टर ज्युली, कल्स्टर कोडिनेटर मोहंमद, ग्रीन इनोव्हेशन सेंटर इंडियाचे प्रोजेक्ट मॅनेजर वेन्डी, सल्लागार जुलीया, मान्स लंटिग, कार्तिक मोहन, राठोड यांच्या पथकाने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार केंद्राला भेट देऊन टोमॅटो मार्केटची पाहणी केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक रंगनाथ घोलप, प्रकाश ताजणे, नासिर मणियार, धनेश संचेती, संजय नवले, शरद चौधरी, व्यापारी सारंग घोलप, दत्तात्रय शिंगोटे, डी. बी. नेहरकर, रविंद्र चव्हाण, अनिल घोलप, रूपेश कवडे, चेतन रूकारी, उप केंद्राचे व्यवस्थापक शरद धोंगडे आदी उपस्थित होते.
नारायणगावातील टोमॅटो लिलाव पाहण्याची इच्छा
उपसभापती डुंबरे म्हणाले, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार उपबाजार केंद्रामार्फत टोमॅटो, डाळींब, कांदा, भाजीपाला व बेल्हे येथील बैलबाजार यामार्फत 700 कोटी रूपयांची उलाढाल होते. नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये सन 2018-19 मध्ये 43 लाख टोमॅटो कॅरेटची खरेदी-विक्री होऊन 104 कोटी रूपयांची उलाढाल झाली. नेदरलॅंड येथे आम्ही पाहणी केल्यानंतर आमच्या भागातील शेतकरी अल्प किटकनाशकचा वापर करून उत्पादन घेतात ही अभिमानाची बाब आहे.
या टोमॅटो मार्केटमध्ये पुणे जिल्ह्यातील विक्रीसाठी येतातच. त्याचबरोबर उस्मानाबाद, बीड, बारामती, नगर या जिल्ह्यातील व 150 ते 200 किलोमीटर परिसरातील शेतकरी आपली टोमॅटो विक्रीसाठी या उपबाजार केंद्रात आणतात हीच बाजार समितीची विश्वासाहर्ता आहे. यावेळी आलेल्या पाहुण्यांशी शेतकरी व व्यापाऱ्यांनी संवाद साधला. बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे यांनी पाहुण्यांचे आभार मानले.
नारायणगाव येथे नव्याने होणाऱ्या उपबाजार केंद्रात पॅकींग हाऊस, कोल्ड हाऊस, शेती मालावर प्रक्रिया करणारे प्रकल्प हे प्रस्तावित आहेत. साधारण एक वर्षाच्या काळात नवीन मार्केटमध्ये आधुनिक स्वरूपात खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होतील.
-धनेश संचेती, संचालक बाजार समिती