#IPL2020 : धोनीच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह

दुबई – अमिरातीत सुरू आसलेल्या आयपीएल स्पर्धेत नेहमीप्राणे चेन्नई सुपर किंग्ज संघ वर्चस्व राखण्यात कमी पडत आहे. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वावरच आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचे कुचकामी नेतृत्वच संघाच्या अपयशी कामगिरीला जबाबदार असल्याची टीकाही आता सुरू झाली आहे. 

चेन्नईचा कर्णधार म्हणून यंदाच्या स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यात धोनीने काही आचंबित करणारे निर्णय घेतले आहेत. हेच निर्णय त्यांच्या संघाला भोवले असल्याचे बोलले जात आहे.
चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या डावात मैदानावर दव पडते त्यामुळे गोलंदाजांना चेंडू ग्रीप करताना त्रास होतो. मात्र, तसे काहीच घडले नाही. त्यामुळे धोनीचा हा निर्णय त्याच्याच अंगलट आला आहे.

या तीनही सामन्यांत चेन्नईला चांगली सलामी मिळाली नाही. शेन वॉटसन व मुरली विजय यांना तीनही सामन्यांत अपयश आल्याने मधल्या फळीवर ताण पडलेला स्पष्ट दिसून येत आहे. फाफ डुप्लेसी वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीतही त्यांचे फिरकी गोलंदाज अपयशी ठरले. अक्षर पटेल, अमित मिश्रा व सर्वात अनुभवी रवींद्र जडेजा हे तीनही फिरकी गोलंदाज प्रभाव दाखवू शकले नाहीत. याबरोबरच धोनीच्या संघाला दुसऱ्या डावात धावांचा पाठलागही करता आलेला नाही.

धावसंख्या दीडशे धावांपेक्षा जास्त असल्यावर जशी फलंदाजी करावी लागते, तशी फलंदाजीच त्यांच्या फलंदाजांना करता आलेली नाही. मधली फळी बेभरवशाची व अननुभवी असल्याचाही त्यांना फटका बसलेला आहे. तसेच खुद्द कर्णधार धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला का येत नाही, अशी विचारणा सातत्याने होत आहे. संघातील अननुभवी खेळाडूंना फलंदाजीची संधी मिळावी हा हेतू असला तरीही त्याचे मोल पराभव पत्करून स्वीकारावे लागत आहे हे देखील धोनीला उमगलेले नाही.

तो स्वतः 6 व्या व 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्याने त्याला षटके कमी मिळत असल्याने धावांचा वेग जरी वाढवला तरी त्याचे रूपांतर संघाच्या विजयात होताना दिसलेले नाही. त्यामुळे आता पुढील सामन्यात पूर्वीचा धोनी सापडतो का, अशाच संभ्रमात सापडलेला धोनीच कायम राहतो यावरच त्यांचे यशापयश अवलंबून आहे,

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.