पुणे – शहरात आघाडीचे जागावाटप आणि त्यानंतर उमेदवारांच्या याद्यांनंतर कॉंग्रेसमध्ये नाराजांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांनाच आव्हान मिळत आहे. या नाराजांची मनधरणी करून त्यांना अर्ज माघारी घेण्यासाठी तसेच त्यांची समजूत घालण्यासाठी आघाडीच्या नेत्यांचे संयुक्त पथक शुक्रवारी आणि शनिवारी दिवसभर नाराजांच्या घरी ठाण मांडून होते. त्यातील काहींची मनधरणी करण्यात नेत्यांना यश आले असले, तरी अद्यापही काही नाराजांनी या पथकापासून दूर राहणेच पसंत केल्याचे चित्र आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात आठ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस हडपसर, पर्वती, खडकवासला आणि वडगावशेरीतून लढणार असून कॉंग्रेसच्या वाट्याला कसबा, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघ आला आहे. तर, कोथरूडची जागा मित्रपक्षाला सोडणार असल्याचे सांगण्यात आले.
यात कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवारास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानुसार दोन्ही पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र, पर्वती, कसबा आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघांतून कॉंग्रेसच्या नाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांची अडचण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी या सर्व नाराजांची भेट घेणे सुरू केले आहे. यात राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह आणखी काही ज्येष्ठ नेते या नाराजांची भेट घेऊन मनधरणी करत आहेत.
या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कसब्यातील नाराज रवींद्र धंगेकर यांची, तर कॅन्टोन्मेंटमधील नाराज सदानंद शेट्टी यांची भेट घेतली. तर कसबा मतदारसंघातील अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या माजी महापौर कमल व्यवहारे यांची भेट घेण्यासाठी हे सर्व पदाधिकारी गेले. मात्र, त्यांची भेट झाली नाही. तर या सर्व पदाधिकाऱ्यांनी पर्वतीमधील कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाचीही भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील केवळ धंगेकर यांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला असून इतर नाराज उमेदवारांची भूमिका पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.