पिंपरी – पिंपरी येथील एका सात वर्षीय मुलाचे अपहरण करुन खून करण्यात आला. याप्रकरणी शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना पिंपरी-चिंचवडमधील वकिलांनी या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र स्वीकारणार नसल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशन आणि नोटरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले की, ही घटना पिंपरी-चिंचवड शहराला काळीमा फासणारी घटना आहे.
या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सचिन थोपटे यांनी आवाहन केले. यावेळी नोटरी असोसिएशनचे पिंपरी-चिंचवड खेड, मावळचे अध्यक्ष ऍड. आतिश लांडगे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. दिनकर बारणे, ऍड. मोनिका गाढवे, ऍड. संकल्पा वाघमारे, ऍड. रामराजे भोसले, ऍड. महेश मासुळकर, ऍड. मंगेश खराबे, ऍड. प्रसन्ना लोंखडे, ऍड. अतुल कांबळे, ऍड. प्रताप साबळे यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.
पिंपरी येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे सोसायटीच्या पार्किंगमधून दोघांनी अपहरण केले. त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला आणि मुलाचा मृतदेह भोसरी एमआयडीसीमधील एका पडक्या कंपनीच्या टेरेसवर फेकला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 9) रात्री उशिरा उघडकीस आला.
आदित्य गजानन ओगले (वय 7) असे अपहरण आणि खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी गजानन श्रीकांत ओगले (वय 49, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात आदित्यच्या अपहरणाची तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.