पुणे – लोहगाव परिसरासह, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्यांना कायद्याचे संरक्षण देण्यासह भयमुक्त वातावरण निर्माण करण्यावर आपण भर देणार असल्याचे आश्वासन महायुतीचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदीश मुळीक यांनी या भागातील मतदारांना दिले.
या भागात अनेकदा सर्वसामान्यांकडून घर बांधणे, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मान्यता घेतल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांची अडवणूक केली जाते. त्यामुळे या नागरिकांना आवश्यक परवाने तसेच कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासह या भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आमदार म्हणून आपला प्रयत्न राहणार असल्याचे मुळीक यांनी स्पष्ट केले. मुळीक यांच्या प्रचारार्थ वडगाव शेरी, साईनाथनगर, राघोबापाटील नगर, वृंदावननगर आणि गलांडे वस्ती या भागात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका सुनीता गलांडे, नगरसेवक संदीप जऱ्हाड, नगरसेविका शीतल शिंदे, साधना भगत, सुधीर गलांडे तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळीही जनता सोबत असेल
गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात राज्यशासन तसेच महापालिकेच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणला आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. तसेच इतरही विकासकामे झालेली आहेत. त्यामुळे केंद्र शासन व राज्य शासनाच्या पारदर्शक कारभारातून मतदारासंघाच्या विकासासाठी प्रयत्न केले असून जनता चुकीच्या अपप्रचाराला बळी न पडता या विधानसभेलाही आपल्या सोबत राहील, असा विश्वास मुळीक यांनी व्यक्त केला.