अल्पसंख्याकांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करावा

परिवर्तनवादी संघटनेचे धरणे : मोहसिन शेख, डॉ. पायल तडवीला न्याय मिळालाच पाहिजे
सातारा – देशभरात अल्पसंख्याकांबाबत होणारा भेदभाव आणि हल्ल्यांबाबत परिणामकारक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नव्या कायद्याचे गठन करा, या मागणीसह मोहसिन शेख आणि डॉ. पायल तडवीला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी परिवर्तनवादी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
पाच वर्षांपूर्वी पुण्यामध्ये मोहसिन शेख या सॉफ्टवेअर इंजिनिअरची धार्मिक ओळखीमुळे निर्घृण हत्या करण्यात आली. गुन्हा दाखल होवून पाच वर्षे उलटल्यानंतर ही न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आलेली नाही.

आरोपी जामिनावर मोकाट सुटले आहेत. नुकसान भरपाईदेखील अद्याप देण्यात आली नाही. सरकारी आश्‍वासनानुसार मोहसिनच्या भावाला सरकारी नोकरी देण्यात आली नाही. शेकडोवेळा मंत्रालयात चकरा मारून कोणीही दाद देत नाही. हताश होऊनच मोहसिनच्या वडिलांचा मृत्यू झाला. मोहसिनच्या कुटंबाची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. एकूणच सरकारी पातळीवर अक्षम्य दिरंगाई, अनास्था व दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. देशाची घटना, कायदा-सुव्यवस्था, न्याय या सर्वांवरचा विश्‍वास उडावा इतकी परिस्थिती गंभीर झाली आहे.

दुसरीकडे नुकतेच 22 जून 2019 रोजी मुंबईतील टोपीवाला मेडिकल कॉलेजमधील मुस्लिम भील समुदायातील डॉ. पायल तडवी या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीस तिच्या तीन वरिष्ठ उच्चवर्णीय महिला डॉक्‍टरकडून केवळ धार्मिक व जातीय विव्देषातून झालेल्या अमानवीय छळास कंटाळून आत्महत्या करावी लागली आहे. एकूणच दलित, आदिवासी व अल्पसंख्याकांविषयी सातत्याने जे विव्देष आणि घृणाचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामधून या समुदायांच्या विरोधातील हिंसाचारात मोठी वाढ झालेली दिसते. सरकारी पातळीवर असे प्रकार रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ठोस प्रयत्न केले जात नाहीत, असे निदर्शनास येत आहेत. झालेल्या घटनांची चौकशी करून गुन्हेगारांवर काटेकोरपणे कारवाई होतानाही दिसत नाही. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ परिवर्तनवादी संघटनेने धरणे आंदोलन केले.

तसेच सर्वात प्रथम मोहसिनच्या भावाला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, मोहसिनच्या कुटुंबाला उर्वरित आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी, खटल्यासाठी विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी, मोहसिन शेख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जावा आणि खटल्याची सुनावणी डे-टू-डे घेण्यात यावी. डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येची तातडीने चौकशी करून अपराध्यांना कडक शासन करण्यात यावे. शैक्षणिक संस्थांमधून जाती व धर्म भेदावरून होणाऱ्या मानसिक छळ व हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी स्वतंत्र नवा कायदा करावा, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

त्यावेळी मिनाज शेख, विजय मांडके, मिलींद पवार, जाकीर शिकलगार, गुलाब शेख, अहमद कागदी, प्रा. डॉ. शिवाजी पाटील, संकेत माने-पाटील, शुभम ढाले, महेश गुरव, रोहित क्षिरसागर, कॉ.वसंतराव नलवडे, शाहीर सचिन माळी, हेमा सोनी, सुभाष जाजू, जयंत उथळे, दिलीप भोसले, प्रा. सुनील गायकवाड, अमर गायकवाड, भगवान अवघडे, मुजफ्फर शेख, तौफिक शेख यांच्यासह मुस्लिम जागृती अभियान, मुस्लिम ओबीसी परिषद, सातारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.