हडपसर, दि. 29 (प्रतिनिधी) – हडपसरमधील पंडित नेहरू भाजीपाला मार्केटमध्ये पावसामुळे अंतर्गत दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी वाहून नेणारी जलवाहिनी तुंबलेली असल्यामुळे तसेच बाजारातील अनेक ठिकाणचे कॉंक्रिटीकरण फुटलेल्या अवस्थेत असल्याने पाणी वाहून जात नाही. काही ठिकाणी खड्ड्यांत पाण्याची छोटी डबकीही साचली आहेत. बाजाराच्या स्वच्छतेबाबत विक्रेत्यांकडून सातत्याने महापालिका क्षेत्रीय कार्यालयाकडे सांगितले जात असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
पुणे मनपाकडे व्यापारी व नागरिकांनी अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पावसात भाजी मंडईमध्ये साचलेले पाणी कमी होण्यास वेळ लागतो.
काही ठिकाणी भाजी विक्रेत्यांनाच पाणी काढण्याचे काम करावे लागते. पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी नव्याने वाहिनी टाकण्याची तसेच मंडई मधील इतर सुविधांची लेखी मागणी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे यापूर्वीच केलेली आहे. मात्र, अद्यापही कोणतेही ठोस काम झालेले नाही. त्यामुळे तातडीने बाजारातील समस्या सोडविण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.
ड्रेनेजवरील झाकण तुटली…
बाजारातून जाणाऱ्या अंतर्गत भागात असलेल्या ड्रेनेजवरील झाकणांच्या सळ्या तुटलेल्या आहेत. यात अनेक ग्राहकांचे पाय अडकण्याच्या घटना घडल्या आहेत, अशा झाकणांवर पोती, दगड ठेवून त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत असला तरी त्यातून धोकाच आहे, अशी झाकणे बदलण्याची मागणीही होत आहे.