बीजिंग: चीनमधील ज्या वुहान शहरातून साऱ्या जगभर करोना महामारी पसरली त्या वुहान शहरातून मात्र करोना हद्दपार झाला असून तेथे असलेले शेवटचे तीन करोना पेशंटही बरे होऊन घरी गेले आहेत. त्या शहरातील तब्बल एक कोटी लोकांची तपासणी करण्यात आली असून शहरात आता करोनाचा एकही पेशंट नाही असे सरकारने अधिकृतपणे घोषित केले आहे.
चीन मध्ये गुरुवारी एकूण पाच करोना पेशंट अन्यत्र आढळले आहेत. ते पाचही जण विदेशातून चीनला आले आहेत. त्यातील चार जण शांघाय येथील असून एक जण सिचुआन प्रांतात आहे. करोनाच्या संशयावरून चीनच्या विविध भागात 297 रूग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे पण त्यात वुहान मधील एकही नागरिक नाही.
चीनच्या अन्य प्रांतात करोना झालेल्या एकूण रुग्णांपैकी 66 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वुहान शहर ज्या हुबेई प्रांतात येत्या तो संपुर्ण प्रांतही आता करोनामुक्त झाला आहे. तेथे गुरुवारच्या तपासणीत एकही नवीन केस आढळून आलेली नाही.