जीवनगाणे: अखेरची शिदोरी

अरुण गोखले

काय गंमत आहे पाहा! माणूस हा जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या मुठी बंद असतात, आणि जेव्हा तो जातो तेव्हा मात्र त्याचे हात उघडे आणि रितेच असतात. हे असं का? ह्या बादशहाच्या प्रश्‍नाला बिरबलाने दिलेले चातुर्यपूर्ण उत्तर इथे आठविल्याशिवाय राहत नाही.

बादशहाच्या या प्रश्‍नाचं उत्तर देताना बिरबल म्हणतो की “”हेच तर मानवी जीवनाच रहस्य आहे. माणूस जन्माला येताना बंद मुठीत आपलं भाग्य, आपलं कर्तृत्व, हुशारी घेऊन येतो. त्यावर तो जीवनात घरदार, धनसंपत्ती, मानसन्मान, अधिकार आणि कितीही माया गोळा करत असला तरी जाताना मात्र त्याला हे सारं इथेच सोडून जावे लागते. ह्यापैकी काहीही त्याच्यासोबत येत नाही. त्यामुळेच त्याने या कशाचाच गर्व, अभिमान व ताठा न धरता माझ्यासोबत येईल अशी अखेरची शिदोरी नेमकी कोणती?” हे जाणून घ्यायला हवे.

व्यावहारिकजगातल्या या गोष्टी जर इथंच राहणार आहेत, तर माझ्यासोबत येईल किंवा हे मला माझ्यासोबत नेता येईल असं काहीचं नाही का? माणसाच्या या प्रश्‍नाचं उत्तर त्याला फक्‍त एकाच ठिकाणी मिळते. ते म्हणजे साधू, संत आणि सदगुरूंच्या दारात.

ते त्याला प्रेमाने जवळ घेतात, माझ्यासोबत काहीच येणार नाही का? ही त्याच्या मनाची घालमेल दूर करण्यासाठी त्याला प्रथम शांत बसवतात. मग त्यालाच ते विचातात की “”तुला कोणी असं सांगितलं की तुझ्याबरोबर काहीच येऊ शकत नाही?” त्यावर तो लगेच आतुरतेने विचारतो “”याचा अर्थ माझ्या सोबत जे येऊ शकते ते काय?”

त्यावर त्यांचे उत्तर असे असते की “”बाबारे, तुझ्यासोबत येईल; पण तुला न दिसणारी एक शिदोरी आहे ती म्हणजे “पुण्याची शिदोरी’. तू जी काही चांगली कर्मे करशील, निरपेक्ष सेवा करशील, जे भगवंताचे नामस्मरण करशील. त्या साऱ्याची पुण्याई हीच फक्‍त तुझ्यासोबत येऊ शकते. बाबारे हे पुण्याईचे धन, ही ठेव अशी आहे की जी एकाची दुसऱ्याला घेता येत नाही. तिच्यावर डल्ला मारता येत नाही. चोरता किंवा बळकावताही येत नाही. सत्कर्म, सद्‌वर्तन, सदाचार आणि नामस्मरण ह्यांची पुण्याई हीच तुझ्याबरोबर येऊ शकते. तीच तुझी खरी अखेरची शिदोरी आहे.

जीवन जगत असताना आपण कोणता मार्ग अवलंबतो त्यावर आपली शिदोरी ठरत असते. त्यामुळे सत्कर्म करून पुण्याची शिदोरी कमवावी.

Leave A Reply

Your email address will not be published.