मोरेवाडीत आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केली पहाणी; आपत्तीग्रस्तांना ब्लॅंकेटचे वाटप
सातारा – मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथे डोंगर खचल्याने माळीण सारखी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेमुळे मोरेवाडी येथील अनेक घरे बाधित झाली आहेत. या घरांवर डोंगराचा काही भाग कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने मोरेवाडी येथे जावून पाहणी केली. ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बाधित कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची सुचना केली. तसेच या बाधित कुटुंबांना स्वत: धान्य देण्याचे स्पष्ट करुन प्रत्येक कुटुंबाला दोन अशी शंभर ब्लॅंकेटचे वाटप शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
सातारा आणि जावली तालुक्यात पावसाने अक्षरश: थैनाम घातले असून सर्वत्र अतिवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. अशातच अनेक ठिकाणी जमीन खचण्याचे प्रकार घडत आहेत. सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथे भुस्खलन झाले असून डोंगरावर भेगा पडल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे खचलेला डोंगराचा भाग गावावर कोसळण्याची भीती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी याबाबत शिवेंद्रसिंहराजे यांना कळवले. शिवेंद्रसिंहराजे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि बाधित घरांची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे यांनी मोरेवाडी येथील डोंगर आणि बाधित घरांची पाहणी केली. डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात गावात पावसाचे पाणी शिरले असून डोंगर खचल्याने अनेक घरे बाधित झाली आहे. या सर्व कुटुंबांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सुचना शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. याबाबत त्यांनी दूरध्वनीवरुन प्रांताधिकारी सौ. स्वाती देशमुख यांच्याशी संपर्क साधुन तातडीने उपायोजना करण्याच्या सुचना केल्या. बाधित कुटुंबांना निवारा उपलब्ध करुन द्या, त्यांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था मी करुन देतो, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
तसेच खबरदारीचा उपाय म्हणून डोंगरावरुन येणारे पावसाचे पाणी दुसरीकडे वळवण्यात यावे, जेणेकरुन भूस्खलन थांबेल. यासह इतर खबरदारीचे उपाय प्रशासनाने करावेत, अशा सुचना शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. तसेच परिस्थितीवर प्रशासनाने लक्ष ठेवून काळजी घ्यावी. गावातील ग्रामस्थांना कोणतीही इजा होवू नये, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मी 24 तास तुमच्यासाठी हजर
आपत्तीग्रस्त बेघर झाल्याने प्रत्येक कुटुंबांसाठी दोन अशी शंभर ब्लॅंकेट तातडीची मदत म्हणून शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी वाटप केले. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तातडीची आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठोसेघर येथील आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध ठेवण्याच्या सुचनाही शिवेंद्रसिंहराजे यांनी आरोग्य विभागाला यावेळी दिल्या. तसेच एस. टी. बस सुरु करण्याच्या सुचना एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या. ग्रामस्थांनी घाबरुन जावू नये. प्रशासन योग्य ती खबरदारी घेईल. परंतु काही अडचण आली तर, त्वरीत माझ्याशी संपर्क साधा. मी 24 तास तुमच्यासाठी हजर आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी ग्रामस्थांना सांगून आश्वस्त केले.