कागदपत्रांची फेरफार करून लाटली जमीन

श्रीगोंदा – तत्कालीन महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जमीन बळकविल्याचा आरोप करीत माजी सैनिक किसन नवले, दादा नाडे यांच्या कुटुंबियांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शिवाय चौकशीच्या नावाखाली शासकीय अधिकारी-कर्मचारी देखील कामात दिरंगाई करीत असल्याचा आरोप या कुटुंबांनी केला आहे.
याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार, किसन नवले व दादा नाडे यांना 19976 साली ‘सिलिंग’ कायद्यान्वये तालुक्यातील येळपणे शिवारात प्रत्येकी तीन हेक्टर जमीन मिळाली होती. परंतु, महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कागदपत्रांची फेरफार करून ती जमीन दुसऱ्याने लाटली.
या प्रकरणी वेळोवेळी शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करून देखील न्याय मिळत नाही. चौकशीच्या नावाखाली न्याय देण्यात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप यावेळी नवले व नाडे कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी निवास नाईक, राजेश नाडे, विकास नाडे आदींनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.





