वर्षानुवर्षे सुरु असलेला जमीनचा वाद अखेर संपुष्टात; ३० वर्षानंतर मिटला दोन्ही कुटुंबातील कलह

रामचंद्र सोनवणे

राजगुरूनगर – गेली दहा वर्षे गावपातळीवर आणि त्यानंतर तब्बल १५ वर्षे  न्यायालयात जमिनीच्या वाटपासाठी कुरकुंडी ता खेड येथील चुलता आणि पुतणीच्या कुटुंबातील तब्बल ५६ जण असलेला दावा आज राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश ए एम अंबाळकर यांनी राष्ट्रीय लोकअदालत मध्ये मिटवला. चुलता पुतणीच्या जमिनीच्या वाटपातील दावा निकाली निघाल्याने दोन्ही कुटुंबातील कलह अखेर सुमारे ३० वर्षानंतर संपुष्ठात आला.

जमिनीच्या वादातून भाऊ-भाऊ, चुलते-पुतणे, मामा-भाचा, बहीण – भाऊ यांच्यातील वाद कोर्टापर्यंत गेल्याच्या अनेक घटना आहेत. त्यातून सामोपचाराने मिटणाऱ्या खटल्यांचे प्रमाण नगण्य आहे. जमिनीच्या वादातून जवळच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत त्याही पलीकडे या वादातून खुनाच्या घटना घडल्या आहेत. न्यायालयात जमिनीबाबतचे खटले प्रलंबित आहेत.

वर्षानुवर्षे हे खटले न्यायालयात सुरु असून त्यासाठी दोन्ही पक्षकार कोर्टात तारखेला उपस्थित राहून पैसे व अमूल्य वेळ वाया घालवतात. न्यायालयीन लढाई लढत अनेक पिढ्या गेल्या, नात्यत्यात दुरावा निर्माण झाला, न्यायालयात दावा दाखल केला म्हणून दोन कुटुंबात होणारे वाद विकोपाला गेले हे वाद संपुष्ठात आणण्यासाठी, दोन्ही पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी आणि त्याचा वेळ पैसे वाचविण्यासाठी सरकारने लोक अदालत सुरु करून आपसातील वाद मिळवण्यासाठी दोन्ही बाजूच्या पक्षकारांना नामी संधी मिळवून दिली आहे.

राजगुरूनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात कुरकुंडी ता खेड येथील  दोन कुटुंबातील वर्षानुवर्षे सुरु असलेला जमीन वाटपाचा वाद संपुष्टात आला. गणपत श्रीपती ढोरे व इतर ४९ विरूद्ध दगडाबाई सोपान ढोरे व इतर ७ अशा ५६ जणांचा जमीन वाटपाचा दावा राजगुरूनगर येथील न्यायालयात सुरु होता. ढोरे कुटुंबात सुमारे १० वर्षे गावपातळीवर हा वाद सुरु होता. त्यानंतर दगडाबाई ढोरे व इतर ६ जणांनी खेड कोर्टात सन २००६ रोजी हा दावा दाखल केला होता. 

सन २०१५ पर्यंत तो सुरूच होता. सन २०१५ मध्ये हा दावा कोर्टानं नामंजूर केला. या निकालाच्या विरोधात जिल्हा न्यायालय पुणे येथे ऍड बाळासाहेब गोगावले यांच्या माध्यमातून दावा दाखल केला. त्यानंतर राजगुरूनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय झाले आणि हा दावा सन २०१७ ला येथील कोर्टात वर्ग करण्यात आला या काळात दोन्ही बाजूकडून तारीख पे तारीख सुरु झाली न्यायालयात दोन्ही बाजूचे पक्षात हेलपाटे मारत होते. 

आज (दि.२५) रोजी  राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालत मध्ये कुरकुंडी येथील दोन्ही पक्षकारांचे वकील अॅड बाळासाहेब लिंभोरे व अॅड बाळासाहेब गोगावले यांच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबाला एकत्र करून समुपदेशन करून हा दावा राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ठेवण्यात आला. 

येथील न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए एम अंबाळकर यांनी दोन्ही कुटुंबातील तब्ब्ल ५० पेक्षा जास्त सदस्यांना या दाव्याच्या बाबत मार्गदर्शन केले. वर्षानुवर्षे भांडत राहण्या पेक्षा दोन्ही कुटुंबात समेट घडवून आणला. दोन्ही पक्षकारांचे वकील अॅड बाळासाहेब लिंभोरे व अॅड बाळासाहेब गोगावल, पॅनल सदस्य अॅड. दीपक चौधरी, अॅड.स्मिता शिंदे यांच्या माध्यमातून तडजोडीतून हा वाद मिटवण्यात आला. तडजोडीतून दोघांनाही न्याय देत दोन्ही कुटुंबाला सुमारे तीस वर्षानंतर एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात १५ वर्षापासून सुरु असलेला जमीन वाटपाचा दावा मुख्य न्यायाधीश ए एम अंबाळकर यांनी तडजोडीतून निकाली काढला. यात कुरकुंडी ता खेड येथील तडजोडीने मिटलेल्या दाव्यात गट क्र ३६७ क्षेत्र ६८ आर व गट क्र ३६८ मध्येक्षेत्र ५ हेक्टर ७४ आर या जमीन वाटपाचा वाद होता. गट नंबर ३६८ मधील ११ गुंठे जमीन रस्त्यासाठी जाब देणाऱ्यास देण्याचे ठरले. व उर्वरित जमिनीत समान हिस्सा देण्याचे ठरले.

या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये ढोरे कुरकुंडी येथील दोन्ही कुटुंबीयांनी तडजोडीने मार्ग काढून निर्णय घेतला व अनेक वर्षांपासून दुरावलेली दोन्ही कुटुंबीय एकत्र आली. दावा निकाली निघाल्यानंतर लहानापासून अगदी वयोवृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यात विशेषतः महिला ज्या एकमेकींच्या गळ्यात पडून आपण एक रक्ताचे आहोत. आपल्यात दुरावा नको, माया, प्रेम आणि रक्ताचे नाते जपण्याचा प्रयत्न करीत होते.

दरम्यान गेली अनेक वर्षाचा हा दावा तडजोड केल्याबद्दल खेड न्यायालय व वकील बार असोशिएशनच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी येथील न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए एम अंबाळकर, न्यायाधीश जी बी देशमुख, डी बी पतंगे, जगदाळे, वकील संघटनेचे अध्यक्ष देविदास शिंदे, जेष्ठ विधीतज्ञ पोपटराव तांबे, दिलीप करंडे, दीपक चौधरी, स्मिता शिंदे, गणेश गाडे, माणिक वायाळ, रमेश गोकुळे, गणेश होनराव, विजय रेटवडे, रोहिणी करंडे, विधी सेवा समितीचे दयानंद निकम, जी एस भोपे, श्रीमती पाटसकर  हे उपस्थित होते.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.