कृष्णा कारखान्याने एका दिवसात केले 9100 मे. टन विक्रमी गाळप

कराड – शिवनगर ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याने या हंगामात सोमवारी 9100 मेटीक टन इतके सर्वोच्च गाळप करत कारखान्याच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या संचालक मंडळाच्या कारर्किदीत एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा विक्रम दोनवेळा केला आहे. कारखान्याच्या 60 वर्षाच्या इतिहासात सर्वोच्च गाळप झाल्याने कृष्णाफच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कृष्णा कारखान्याने या हंगामात आजअखेर प्रतिदिन सरासरी 8000 मेटीक टनाहून अधिक क्षमतेने 9 लाख 97 हजार 640 मे. टन ऊसाचे गाळप केले असून, 12 लाख 74 हजार 420 क्‍विंटल साखर उत्पादित केली आहे. दिवसाचा साखर उतारा 13.35 टक्‍के असून सरासरी साखर उतारा 12.70 टक्‍के इतका आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी 1 जानेवारी 2016 रोजी 9040 मेटीक टन इतके एका दिवसात उच्चांकी गाळप केले होते. त्याचबरोबर गतवर्षी कारखान्याने 15 लाख 21 हजार 65 क्‍विंटल साखर उत्पादित केली होती. त्यावेळी कारखान्याच्या इतिहासातील हे द्वितीय क्रमांकाचे सर्वाधिक साखर उत्पादन होते. तसेच सलग दोन वर्षे कृष्णेच्या शेतकऱ्यांनी राज्यात सर्वाधिक ऊस उत्पादनाचे राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. यासारखे अनेक विक्रम कारखान्याने केले आहेत.

चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने गेल्या चार वर्षांपासून कारखाना कामकाजात पारदर्शकता आणली आहे. कारखान्यास आर्थिक शिस्त लावली आहे. कारखान्याच्या शेतकी विभागाने नियोजनबध्द तोडणी यंत्रणा राबविली आहे. यांत्रिकीकरणावर भर देत कारखान्याची तोडणी यंत्रणा हार्वेस्टर मशिनने सुसज्ज केल्याने, शेतकऱ्यांना वेळेत तोड मिळत आहे.

तसेच मोफत साखर, शेतकरी संवाद मेळावे, वाकुर्डे योजनेसाठी अर्थसहाय्य व 81-19 योजनेत कृष्णा कारखान्याच्या सभासदांचा समावेश करावा यासाठी प्रयत्न, सुसज्ज कृषि महाविद्यालय, द्रवरूप जिवाणू खत प्रकल्प उभारणी, जयवंत आदर्श कृषी योजना, एकरी 100 टन उत्पादन ऊसविकास योजना, कारखाना व डिस्टलरीचे आधुनिकीकरण, कर्मचारी कल्याण योजनेची प्रभावी अंमलबजावणी, यासारखे सभासद हिताचे निर्णय घेतले आहेत. विक्रमी गाळप केल्याबद्दल कारखान्याच्या संचालक मंडळाकडून अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.