पाटण – कोयना धरण परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भूकंपाच्या दोन सौम्य धक्क्याने कोयनानगर हादरले. एकापाठोपाठ झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यामध्ये किकली गावाच्या पूर्वेस सात किलोमीटरवर असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले. मात्र, दोन्ही भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. कोयना धरणापासून भूकंपाचे केंद्रबिंदूचे अंतर वीस किलोमीटर होते.
कोयना, वारणा तसेच पाटण परिसरात जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता 3 व 2.8 रिश्टर स्केल एवढी नोंदण्यात आली आहे. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. कोयना वारणा व पाटण परिसरात या भूकंपाचा धक्का बसला आहे. दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का बसला. तर लगेच दुसरा भूकंपाचा धक्का 3 वाजून 33 मिनिटांनी जाणवला.