युवतीचे अपहरण अन्‌ सुटकाही

साताऱ्यातील घटना : चार तासांत अपहरणकर्त्याच्या आवळल्या मुसक्‍या

सातारा – सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून रिक्षात बसलेल्या युवतीचे अपहरण करणाऱ्या रिक्षाचालकाच्या सातारा शहर पोलीसांनी अवघ्या चार तासात मुसक्‍या आवळल्या आहेत. सोमवारी दुपारी सातारा बस स्थानकातून संगमनगर येथे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या युवतीचे रिक्षा चालकानेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र युवतीने प्रसंगावधान राखुन स्वत:ला वाचवण्यासाठी रिक्षातुन उडी मारली. त्यामुळे युवतीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलीसांनी तात्काळ आरोपीच्या शोधासाठी चार पथके रवाना करून त्याच्या मुसक्‍या आवळल्या. संतोष उर्फ नऱ्या रतन झोंबाडे (रा.प्रतापसिंहनगर,सातारा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी सातारा बसस्थानकातून संगमनगर येथे जाण्यासाठी बसस्थानक परिसरातील एका थांब्यावरील रिक्षात बसली होती. यावेळी रिक्षात इतरही काही प्रवासी होते. मात्र बॉम्बे रेस्टॉरंट येथील थांब्यावर सहप्रवासी उतरल्यानंतर पिडीत युवती एकटीच रिक्षात होती. पुढे संगमनगर बसस्टॉपजवळ युवतीने रिक्षा थांबवण्याची विनंती करूनही रिक्षा चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. बराच वेळ त्याला रिक्षा थांबवण्याची वनंती करूनही तो रिक्षा थांबवत नसल्याचे पाहुन त्या युवतीने परिस्थिती ओळखत रिक्षातून उडी मारली. यात युवतीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत सातारा शहर पोलीसांनी शहरातील सुमारे शंभरहून अधिक रिक्षांची तपासणी केली. त्यानंतर युवतीने सांगितलेले वर्णन व शहरारातील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीला (एमएच11 एबी 0093) या रिक्षासह राहत्या घरातून ताब्यात घेतले.

ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख,पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पोरे, सतिश पवार गुन्हेप्रकटीकरणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, सहाय्यक फौजदार खुडे, पोलीस नाईक शिवाजी भिसे, मुनिर मुल्ला, सुनिल भोसले, अनिल स्वामी, अविनाश चव्हाण, संतोष भिसे, धीरज कुंभार यांनी सहभाग घेतला.सातारा शहरात दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली होती. सामान्य नागरिकांसह पोलीस दलाचीही मती गुंग झाली होती. मात्र पिडीत युवतीकडून अत्यंत विश्‍वासाने घटनाक्रम जाणुन घेत शहर पोलीसांनी आरोपीच्या मुसक्‍या आवळल्याने कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.