आनंदी जीवनाची गुरुकिल्ली

एके ठिकाणी वधूवर सूचक केंद्र उघडलं गेलं होतं. एक तरुण स्वतःसाठी मुलगी बघायला तिथं आला, स्वागतिकाने त्याला आत जाण्यास सांगितले, तिथं आत दोन दारं होती, एका दारावर लिहले होते की “तुम्हाला तरुण पत्नी हवीय का?’ तर दुसऱ्यावर लिहलं होतं, की “वयस्कर चालेल?’ स्वाभाविकच तरुणाने पहिले दार निवडणे श्रेयस्कर समजले, आणि तो आत गेला. आत परत दोन दारं नजरेस पडली. एकावर पाटी होती “सुंदर पत्नी’ तर दुसऱ्यावर होती “साधारण पत्नी!’ त्याने सुंदर लिहलेल्या पाटीच्या दारातून आत जाण्याचा निर्णय घेतला. आत पुनः दोन दारं दिसली, अर्थात पहिल्या दारावर पाटी होतीच, “एक जेवण बनवू शकणारी’ दुसऱ्यावर “जेवण न बनवू शकणारी’, अर्थातच तरुणाने पहिल्या दारातून जाण्यास पसंती दिली, पुन्हा दोन दारं उभी ठाकली, “प्रेमळ पत्नी की कजाग?’ त्याने प्रेमळ लिहिलेले दार उघडले. आता परत दोन दारं. “हुंडा आणणारी’ अथवा “हुंडा न आणणारी’, त्याने परत पहिले दार निवडले. आता तो शेवटच्या खोलीत पोहोचला होता, तिथं समोर एक मोठी पाटी लावलेली होती आणि एक भला मोठा आरसाही होता. त्या मोठ्या पाटीवर लिहीलं होतं; “आपल्या अपेक्षा जरा जास्त आहेत, कृपया स्वतःला एकदा आरशात बघून घ्या.’

ह्या गोष्टीतील गमतीचा भाग सोडला तर अशी गल्लत आपणही रोज करत असतो. रोजच्या जगण्यात आपण करत असलेल्या अपेक्षेस आपण पात्र आहोत की नाही हे तपासतच नाही. अनेक लहान सहान गोष्टीत आपल्या ढीगभर अपेक्षा असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कधी केलेल्या कामाचे श्रेय मिळण्याची अपेक्षा, तर कधी कौतुकाची अपेक्षा, कोणाला मदत केली म्हणून त्याच्याकडून धन्यवादाची अपेक्षा, अशा कित्येक अपेक्षा अनाहूतपणे आपल्या मनात घर करून असतात. त्यापेक्षाही बऱ्याचदा वायफळ अपेक्षेने उदाहरणार्थ “त्याने ओळखच दिली नाही’, “मला कोणी विचारलेच नाही’, “तो बोललाच नाही’, “त्याने बघितलेच नाही’, अशाने स्वतःला त्रास करून घेत असतो, खरं तर खूपदा आपल्या अपेक्षांचं संबंधित व्यक्तीला गंधही नसतो आणि आपण मात्र इकडं त्याच्या नावाने शंख करत, कुढत बसतो आणि आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेत असतो.

थोडा वेगळा विचार केला तर अपेक्षा म्हणजे काय? तर आपल्यासाठी आपण केलेल्या दुःखाचे बीजारोपणच, कारण अपेक्षाभंग झालं की निर्माण होणारे विषाद, नाराजी, चिडचिड, आकस हे सारे आपल्या मानसिकतेवर नकारात्मक प्रभाव टाकतात. लक्षात असू द्या की, अपेक्षा ही एकटी जन्माला येत नसते, तर तिच्या पाठोपाठ अपेक्षाभंगचा सलही येतोच.
आपण जेव्हा अपेक्षा ठेवतो एका अर्थाने आपल्या सुखं दुःखाच्या, आपल्या संवेदनेच्या चाव्याच समोरच्याच्या ताब्यात देतो. त्याने अपेक्षापूर्ती केली तर आपण आनंदी; अन्यथा नाराज. एवढेच नव्हे तर, आपल्या अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या व्यक्तीबद्दल मनात द्वेषही निर्माण होतो.

खरं पाहता आपण कसं राहावं, आपण कसं असावं एवढंच आपल्या हाती असतं, इतर कोणी कसं असावं, त्यांनी कसं वागावं? हे आपल्या अखात्यारीबाहेर असते, तरीसुद्धा आपण स्वतःच्या आखलेल्या चौकटीतून त्यांना पारखत असतो.

साधारणपणे आपली सारी कामं फळाच्या अपेक्षेवरच बेतलेली असतात, पण भारतीय दर्शनशास्त्र मात्र याला वेगळा साज देतो आणि तीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

थोड्याशा विवेकदृष्टीने बघितले तर निसर्ग, सूर्य ताऱ्यांपासून ते नदी, झाडं, मातीपर्यंत सारेच त्यांना नेमून दिलेले काम अव्याहतपणे करत असतात, परत काहीही मागत नाहीत. आपणही त्यांच्या गुणांचा स्वीकार केला तर एका सुस्वभावी समाजाची रचना होऊ शकते.

आपण कोणासाठी काही करू शकलो तर “नेकी कर दर्या में डाल’ या उक्तीप्रमाणे त्यास विसरणेच उचित. तेव्हा शक्‍य होईल तिथं तिथं अपेक्षा कमी करा आणि आनंदी जीवन जगा. सुखी आणि समाधानी जीवनाची हीच एक गुरुकिल्ली आहे, हे नक्की. तुम्ही विचार करा, आणि आपले जीवन अधिकाधिक सुखमय बनवू शकता.

– सत्येंद्र राठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)