मुंबई – राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके याने वैविध्यपूर्ण मराठी चित्रपट दिले आहेत. चार वर्षांच्या कालावधी नंतर सुजय त्याच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा नवीन अफलातून भेट घेऊन येत असून त्याच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘केसरी’ असे आहे. नुकतेच या चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात असून, सोशल मीडियावर या टीझरला जोरदार लाईक्स मिळत आहेत.
दरम्यान, ‘महाराष्ट्र केसरी’ या मानाच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम लढतीपूर्वी माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष ‘शरद पवार’ यांच्या हस्ते या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले होते. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
‘केसरी’ चित्रपटाची संपूर्ण कथा कुस्ती भोवती गुंफण्यात आलेली आहे. कुस्ती खेळण्याची आवड असलेला अत्यंत गरीब घरातील एक मुलगा महाराष्ट्रातील मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतो. या प्रवासादरम्यान त्याच्या आयुष्यात येणारे विविध अडथळे, पहिलवानांचे कष्ट, त्यांना घडवणाऱ्या वस्तादांची मेहनत आणि कुस्तीच्या आखाड्या बाहेरचे राजकारण या सर्वांचा वेध या चित्रपटात घेण्यात आला आहे. हा मराठी चित्रपट येत्या २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.