पूरग्रस्तांना मदतीलाही कात्रजचा घाट

मनपा प्रशासनाचा कामांमध्ये अनियमितपणा : पूरग्रस्तांमधून नाराजी 

कात्रज – 25 सप्टेंबरला कात्रजच्या डोंगर परिसरामध्ये रात्री अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे आंबिल ओढाल्या पूर येऊन लगतच्या व डोंगर माथ्यावरील अनेक ठिकाणी बैठी घरे, इमारतीच्या सीमाभिंती, रस्ते, ड्रेनेज लाइन याचे फार मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय अनेकाचे संसार उद्‌ध्वस्त झाले. या पूरस्थितीनंतर जागे झालेल्या मनपा प्रशासनाने देखील मदत कार्याच्या कामांमध्ये अनियमितपणा केलेला दिसून येत आहे. याबद्दल पूरग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुरामुळे नुकसान झालेल्या भागामध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक 35 येथील सहकारनगर, पद्मावती या भागामध्ये प्रशासकीय यंत्रणेमार्फत बऱ्याच चांगल्या पद्धतीने मदत राबवली जात आहे. मात्र, दुसरीकडे प्रभाग क्रमांक 38 मधील बालाजीनगर व 40 मध्ये येणाऱ्या आंबेगाव, दत्तनगर, कात्रज गावठाण, या परिसरातील नुकसानग्रस्त भागाकडे अजूनही दुर्लक्ष झालेले दिसत आहे. तर काशिनाथ पाटीलनगर, बालाजी नगर येथे राडारोडा उचलण्याचे व साफसफाईचे काम अजूनही संथ गतीने सुरू आहे. तर अजूनही ही यंत्रणा काही ठिकाणी पोहोचली नाही आणि कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी देखील केली नाही. त्यातच पंचनामे करण्याचे काम संथगतीने सुरू असून मदत मिळालेली नाही. तसेच साफसफाई देखील येथे अजून केलेली नाही.

माझ्या घरामधील सर्व सामान पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहे. तर, घरामध्ये पाण्यामुळे साचलेला चिखल काढण्यासाठी येथे कोणीही आले नाही. तो आम्हीच साफ केला.
– आशालता घोरपडे पूरग्रस्त वृद्ध महिला, कात्रज


ओढ्याच्या पुराच्या पाण्याने आमचा संपूर्ण कारखाना पाण्यामध्ये बुडला होता. त्यामधील सर्व सामान वाहून गेले आणि सर्व चिखल माती कारखान्यांमध्ये भरला होता. याची माहिती मनपाच्या प्रशासनाला दिली, पण कोणीही ही स्थिती पाहण्यासाठी आलेले नाही.
– सागर बेलोसे स्विच बोर्ड कारखाना, बालाजीनगर

Leave A Reply

Your email address will not be published.