कर्नाटकमधील पेच पोहचला सर्वोच्च न्यायालयात

सभापती मुद्दाम राजीनामे स्वीकारत नसल्याचा बंडखोर आमदारांचा आरोप

नवी दिल्ली -कर्नाटकमधील राजकीय पेच बुधवारी सर्वोच्च न्यायालयात पोहचला. त्या राज्यातील 10 बंडखोर आमदारांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्यामध्ये विधानसभेचे सभापती के.आर.रमेश कुमार मुद्दाम आमचे राजीनामे स्वीकारत नसल्याचा आरोप त्या आमदारांनी केला आहे.

कुमार यांनी मंगळवारी 14 बंडखोर आमदारांपैकी 9 जणांचे राजीनामे योग्य स्वरूपात नसल्याचे सांगत ते स्वीकारण्याचे टाळले. त्यामुळे बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कर्नाटक सरकार अल्पमतात आले आहे. मात्र, सभापती ते वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. सरकार अल्पमतात आले असूनही मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव मांडण्यास नकार दर्शवत आहेत.

राज्य सरकार आणि सभापती हातात हात घालून कृती करत आहेत. त्यामुळे विधानसभेचा विश्‍वास नसलेले अल्पमतातील सरकार अवैधरित्या सत्तेवर असल्याची भूमिका याचिकेत मांडण्यात आली आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांनी नव्याने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमचे राजीनामे स्वीकारण्याचा आदेश सभापतींना द्यावा, असे साकडे त्यांनी न्यायालयाला घातले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.