कर्नाटक सरकार कोसळले

विधानसभेत शक्तिपरीक्षा जिंकण्यात कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला अपयश
* सरकारच्या बाजूने 99 मते, तर विरोधात 105 मते
* बंडखोरांसह 20 आमदार राहिले अनुपस्थित
* तीन आठवडे चाललेल्या राजकीय नाटकावर अखेर पडदा

बंगळूर -कर्नाटक विधानसभेत शक्तिपरीक्षा जिंकण्यात कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला मंगळवारी सपशेल अपयश आले. त्यामुळे त्या राज्यातील 14 महिन्यांचे आघाडी सरकार कोसळले. त्यातून कर्नाटकात जवळपास तीन आठवडे सुरू असलेल्या राजकीय नाटकावर अखेर पडदा पडला.

कॉंग्रेस-जेडीएसच्या काही आमदारांनी बंड पुकारल्याने कर्नाटकमधील आघाडी सरकार धोक्‍यात आले होते. त्यामुळे राजकीय अनिश्‍चिततेची कोंडी फोडण्यासाठी सरकारने शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यातून विधानसभेत सरकारने विश्‍वासदर्शक ठराव मांडला. त्यावर तीन दिवस मतदान होऊ न शकल्याने कर्नाटकचे नाटक लांबतच राहिले. अखेर चौथ्या दिवशी म्हणजे मंगळवारी त्यावर मतदान झाले.

सरकारच्या बाजूने 99 मते पडली, तर 105 मते विरोधात गेली. आघाडीचे 17, बसपचा 1 आणि 2 अपक्ष मिळून 20 आमदार विधानसभेत अनुपस्थित राहिले. त्यामुळे विधानसभेचे एकूण संख्याबळ 204 पर्यंत खाली येऊन बहुमतासाठी 103 आमदारांचा पाठिंबा आवश्‍यक बनला. मात्र, तो जादुई आकडा गाठण्यात सत्तारूढ आघाडीला अपयश आले. बंडखोर आमदारांना विधानसभेत उपस्थित राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे बंडखोर आमदार अनुपस्थित राहिल्याने आघाडी सरकारचे दिवस भरले आणि सरकार स्थापनेच्या भाजपच्या आशा पल्लवित झाल्या.

विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान होण्यापूर्वी शक्तिपरीक्षेत अपयश येण्याची पुरेपूर जाणीव असलेल्या मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी विधानसभेत चर्चा संपवताना पायउतार होण्याचे संकेत दिले. त्यांनी भाजपवरही जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपचे नवे सरकारही फार काळ टिकणार नाही. पुढील सरकार कोसळल्यास विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले. कॉंग्रेस-जेडीएस आघाडीच्या 16 आमदारांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा देत बंड पुकारले. त्याशिवाय, 2 अपक्ष आमदारांनी आघाडीचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे संकटात सापडलेले सरकार अखेर कोसळले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)