जुन्या बाजाराचा तिढा सुटला

पुणे – मंगळवार पेठेतील जुन्या बाजाराच्या पुनर्वसनाचा तिढा काही अंशी सुटला आहे. बाजारस्थळी मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांना जवळची मोकळी जागा, तर रस्त्याची एक लेन पूर्णत: बॅरिकेडिंग करून विक्रेत्यांना देण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी रविवारी बाजारही सुरळीत भरला, तसेच वाहतुकीसाठी दोन स्वतंत्र लेन पूर्णत: उपलब्ध झाल्या. दरम्यान, विक्रेत्यांना दिलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात चिखल होता. त्यामुळे प्रशासनाची करसत झाली.

शाहीर अमर शेख चौकात होणारी व परिणामी मध्यवर्ती भागात पसरणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जुना बाजार बंद करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले होते. त्याची अंमलबजावणीही मागील बुधवारी करण्यात आली. यावेळी संतप्त विक्रेत्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर या विक्रेत्यांची संयुक्त बैठक महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी घेतली.

त्यात, या व्यावसायिकांना महापलिकेने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत बसण्याची जागा वाटून द्यावी, तसेच रस्त्यावरच्या एक लेनला बॅरिकेडिंग करून इतर पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यावर येथे
सर्वेक्षण केले असता, सुमारे 500 व्यावसायिक आढळून आले. त्यानंतर पालिकेकडून रस्त्यावरील लेनमध्ये सुमारे 200 जणांना, तर खालील रिकाम्या जागेत सुमारे 300 जणांना पाच बाय सहा फुटांची (एक कॉट) जागा व्यवसायासाठी देण्यात आली. त्याचा नकाशा तसेच लाभार्थींची यादी घेऊनच या जागेचे वाटप पालिकेकडून शनिवारी करण्यात आले होते.
त्यानुसार, रविवारी सकाळी विक्रेत्यांना या ठिकाणी बसविण्यात आले. दरम्यान, या वेळी गोंधळ होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

चिखलामुळे जागा वाटपासाठी कसरत
येथील विक्रेत्यांना पालिकेकडून प्रत्यक्ष मार्किंग करून जागा देण्यात येणार होती. मात्र, ज्या जागेत विक्रेत्यांना बसविले जाणार होते, तेथे सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला. त्यामुळे पालिकेला आखणी न करता अंदाजाने जागा द्यावी लागली, तर अनेक विक्रेत्यांनी चिखलामुळे जागा मिळाल्यानंतरही व्यवसाय केला नाही.

बुधवारी स्पष्ट होणार परिणाम
निश्‍चित केलेल्या जागेतच या विक्रेत्यांना बसविल्याने या रस्त्यावर रविवारी फारशी वाहतूक कोंडी नव्हती. त्यातच सुट्टी आणि पाऊस असल्याने वाहनांची संख्याही कमी होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. आता प्रत्यक्षात वाहतूक कोंडीवर किती फरक पडला, हे बुधवारच्या बाजारानंतरच स्पष्ट होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.