विजयाचा जल्लोष अन्‌ पराभवाची निराशा

क्षणभर विश्रांती

उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेले कार्यकर्ते दुपारी झाडाखाली बसून क्षणभरासाठी विश्रांती घेताना दिसुन आले. कार्यकर्ते शीतपेय, ऊसाचा रस, आमरस पिऊन तहान भागवित होते. काही व्यावसायिकांनी निवडणुकीच्या निमित्ताने व्यवसाय करण्याची अनोखी संधी साधुन घेतली. पाण्याच्या बॉटल्स थेट कार्यकर्त्यांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था त्यांनी केली होती.

मार्ग बंद केल्याने वाहतूक कोंडी

बालेवाडी क्रीडासंकुलात अधिकृत पासधारकांना प्रवेश दिला जात होता. संकुलाकडे जाणारा मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला होता. तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळविली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती.

पिंपरी – मावळ लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मात देत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भगवे झेंडे फडकावत गुलालाची मनसोक्‍त उधळण केली. तसेच, नृत्याचा आनंद लुटला. तर, दुसरीकडे पार्थ पवार यांना पराभव पत्करावा लागल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना निराशा लपवता आली नाही.

बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सकाळी आठपासून मतमोजणीला सुरवात झाली. सकाळपासूनच येथे कार्यकर्ते जमण्यास सुरवात झाली. दुपारी 12 पर्यंत मोजकेच कार्यकर्ते हजर होते. दुपारनंतर मात्र हळुहळु कार्यकर्त्यांची गर्दी वाढु लागली. पहिल्या फेरीपासुन बारणे यांनी मतांची आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीपर्यंत ही आघाडी टिकून होती. त्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्याऊलट आघाडीचे कार्यकर्ते हिरमुसल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

उन्हाच्या काहिलीने हैराण झालेले कार्यकर्ते झाडांखाली विखुरलेल्या अवस्थेत थांबले होते. भाजप-शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी व अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी थांबण्याकरीता वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उद्‌भवू नये, यासाठी त्यांच्या थांबण्याच्या ठिकाणामध्ये एक ते दोन किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले होते.

फेरीनिहाय निकाल जाहीर होताना क्षणाक्षणाला ताणली जाणारी उत्कंठा कार्यकर्त्यांमध्ये पाहण्यास मिळत होती. उत्साह, आनंद आणि निराशा अशा संमिश्र भावनांचे दर्शन घडत होते. बरेच कार्यकर्ते मोबाईलवर निकाल पाहण्यात व्यस्त होते. सायंकाळपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होत आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी क्रीडासंकुलाबाहेर श्रीरंग बारणे यांना खांद्यावर उचलुन घेत जल्लोष केला. गुलालाची मनसोक्त उधळण केली. तर, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माघारी फिरणे पसंत केले.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर होत असताना बालेवाडी क्रीडासंकुल येथे हातात तिरंगा झेंडा घेऊन 83 वर्षीय तुकाराम वारे हे मतदान जागृती करीत होते. ते म्हणाले, “”देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, अत्याचार थांबण्यासाठी सर्वसामान्य जनतेने मतदान केले आहे. कोणाचा विजय, कोणाचा पराभव किंवा कोणाचे डिपॉझिट जप्त करण्यासाठी मतदान केलेले नाही. मतमोजणीच्या दिवशी मतदानाबाबत जागृती व्हावी, यासाठी मतमोजणी केंद्रावर फिरत आहे.”

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×