सांगीतिक जीवनाचा आनंद

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या तीन मुलभूत गरजांची पूर्तता खरं तर शरीरासाठीच होत असते. पण मनाचं काय ? ते दिसत नसलं तरीही असतंच. आपल्या जगण्यापलीकडच्या जीवनाला मनामुळे वेगळं असल्याची प्रचीती येते. काहीवेळा असं वाटतं की, अनेकांकडून केवळ शरीरासाठीच सर्वकाही केलं जातं. पण मनाचा, मनातल्या मनात, मनमुरादपणे किंवा मनमारून मनपसंद असा कधी विचार खरंच होतो का ? निदान तसं दिसत तरी नाही. मनंच आपल्याला जगायला शिकवतं, मनंच आपल्याला पदोपदी अनेकविध निरनिराळ्या प्रसंगांची अनुभूती देतं. दुसऱ्याचंच काय पण आपल्या स्वतःच्या मनाचा सुद्धा थांग पत्ता लागणं मुश्‍कील असतं. आपल्या शरीरावर ताबा ठेवून त्याला स्थिर करू शकतो पण मनावर नियंत्रण ठेवणं मोठं कठीण काम असतं.

श्री रामदासस्वामींच्या मनाच्या श्‍लोकातील पक्ती आपल्या अंतर्मनाची ओळख करून देतात. मन सज्जन असलं पाहिजे, नुसतं सज्ज असून उपयोग नाही. आपल्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आपल्या अंतरंगावरूनच होत असते. आपल्या बाह्यांगावर आपलं प्रथमदर्शनी रूप दिसत आणि ठरत असलं तरीही अंतरंगात मूळ व्यक्तिमत्व लपलेलं असतं. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंतर्मनावर संस्कार होणं जरुरीचं असतं. त्याला आनंदी ठेवणं गरजेचं असतं. श्री रामदासस्वामींच्या मनाच्या श्‍लोकामुळे या संस्काराची पूर्तता होऊ शकते.

ह्या श्‍लोकांमुळे प्रत्येकाच्या श्‍ब्दोचारांमध्ये स्पष्टता आणि शुद्धता मिळवता येत असते. सद्य:स्थितीत किती शाळांमधून श्री रामदासस्वामींचे मनाचे श्‍लोक विध्यार्थ्यांकडून म्हणून घेतले जातात? हे मनाचे श्‍लोक खऱ्या अर्थानं मनाला सज्जन करण्याचं काम करू शकतात, ह्याची जाणीव होणं आणि ते अंगीकारणे ही काळाची गरज आहे. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपलं मन करारे प्रफुल्लीत या जाणीवेनं मनाकडे बघणं महत्वाचं आहे.

साधेपणा म्हणजे भोळेपणा नाही
सद्य:स्थितीत साधेपणा म्हणजे भोळेपणा अथवा गबाळेपणा समजला जातो. अत्याधुनिकीकरण आणि काही प्रमाणात अंधानुकरण ह्यामुळे एकूणच आपल्या राहणीमानात बरेच बदल होत असतात. हे होणारे बदल एका अर्थी आपला विकासच घडवत असतात. आपले केवळ नीटनेटकं राहणं हे पुरेसं नसून आपण चारचौघांमध्ये वेगळं आणि आकर्षक दिसणं आवश्‍यक झालं आहे. मुळातच सुंदर असणं आणि आकर्षक दिसणं ह्या दोन्ही गोष्टी जरी सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या असल्या, तरीही केवळ सुंदर असणं सुद्धा पुरेसं नसून आकर्षक दिसणं आणि त्यासाठी नीटनेटकं राहणं आवश्‍यकच असतं. यामुळेच सुंदर असण्यापेक्षाही सुंदर दिसण्यासाठी काहीजणांचा कल असतो. सुंदर, आकर्षक राहणीमानासाठी निश्‍चितच मानसिककदृष्ट्‌या काही बाबी करणं अनिवार्य असतं. ह्या राहणीमानाची नुसती सवय होऊन चालत नाही, तर असं राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी थोडाफार वेळ खर्चही करावा लागणं स्वाभाविक असतं. ह्या सौदर्याची प्रचीती घेण्यासाठी आपल्या मनाला आनंदी ठेवणं जरुरीचं असतं.

स्वमग्नतेत न राहण्यासाठी संगीत ऐकावं
काहीजणांमध्ये स्वमग्नतेचे प्रमाण अलीकडच्या काळांत अधिक असल्याचं जाणवत आहे. ह्याचा निश्‍चितच थेट संबंध आपल्या अंतर्मनाशी असतो. मनाचा विचार न करता केवळ कोणत्यातरी अनावश्‍यक बाबींचा अनावधानाने विचार करणे ह्यामध्ये सुरु होत असते. काही प्रमाणांत अशी व्यक्ती आत्मकेंद्रित झाल्याचा आपल्याला प्रत्यय येऊ लागतो. अशा व्यक्तींच्या अंतर्मनांत सुरु असलेल्या वैचारिक प्रक्रियेत अनाठायी विचारांचा कल्लोळ माजलेला असतो. त्यांच्या शरीर आणि मन ह्याचा मिलाफ होणं शक्‍य होत नाही. मनातील विचार, शरीराचं वर्तन ह्यांचा परस्परांशी संबंध राहिलेला नसतो. अनेकदा ह्या स्वमग्नतेमुळे स्वतःच्या अस्तित्वाची देखील जाणीव रहात नाही आणि प्रत्येक कृतीत एकप्रकारे विकृतीच दिसून येऊ लागते. स्वमग्नतेत न राहता संगीत ऐकत राहावं. संगीताचा परिणाम थेट अंतर्मनावर होत असतो आणि तो स्वमग्नतेतून बाहेर काढू शकतो. आपल्यापैकी प्रत्येकजण दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी धडपडत असतो. सद्य:स्थितीत आपल्या मुलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी सर्वप्रथम अर्थार्जन अनिवार्य झाले आहे. असं जरी ही असलं तरीही आपल्या मानसिक स्वास्थ्याचा विचार करणं तितकंच महत्वाचं असतं.

आधुनिक वैद्यक शास्त्रात देखील संगीत महत्त्वाचं
आधुनिक वैद्यकशास्त्रातसुद्धा संगीताचा वापर औषधोपचारासारखा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कॅन्सर, हृदयविकार, सिझेरियन अथवा इतर शस्त्रक्रिया करताना संगीताचा किती उपयोगी होऊ शकतो? ह्यावर संशोधन सुरू असल्याचं म्हंटलं जातं. कॅन्सरसारख्या जीवघेण्या व्याधीमध्ये केमोथेरपीच्यावेळी संगीत ऐकल्यास मळमळ, उलटी यासारखे साइड इफेक्‍ट टाळता येत असल्याचं वैज्ञानिक प्रयोगाद्वारे स्पष्ट झालं आहे. संगीताच्या लयबद्ध नादामुळे उजव्या आणि डाव्या मेंदूमधील सुसूत्रीकरण होण्यास मदत होत असल्याचं समजतं. प्रत्येक व्यक्तीला संगीतातील विशिष्ट ताल-लय आवडेलच असं नाही. प्रत्येक व्यक्तीची अभिरुची भिन्न-भिन्न असते, हे लक्षात घेऊन संगीतोपचार करणं अनिवार्य ठरतं. ते जाणून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या संगीताचे कार्यक्रम आयोजित करावे लागू शकतात. प्रत्येक व्यक्तीला शास्त्रीय संगीतामुळे छान प्रसन्न, उत्साही वाटेलच असं नाही.

केवळ मनुष्य प्राणीच नाही, तर पशुपक्षी देखील संगीताचा आनंद घेतात, असं निदर्शनास आलं आहे. संगीताच्या श्रवणानं वनस्पतीची देखील वाढ जलद आणि अधिक होऊ शकते, असं निसर्ग शास्त्रीय प्रयोगाद्वारे सिद्ध झालं आहे. संगीतामुळे मनाला शांती मिळते, मनाला प्रसन्न करण्याचं काम संगीतामुळे होत असतं. पूर्वी घंटानादापासून रोगमुक्ती या संकल्पनेचा विकास झाला होतो. आजच्या काळामध्ये ताणतणावाचं निवारण करण्यासाठी संगीताला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.

व्यक्तिगत आजारासाठी संगीत हा रामबाण ईलाज
व्यक्तिगत नैराश्‍याबरोबरच कौटुंबिक ताणतणाव, व्यावसायिक विपरीत परिस्थितीचा ताण, निद्रानाश, सततची चिंता, ह्या मनाच्या अवस्थाही वाढल्या असल्याचं आपण अनुभवतो. त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी विविध आध्यात्मिक मार्गांचाही शोध घेण्याचा प्रयत्न अनेक जण करताना दिसतात. ह्याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सदुपयोग मानसिक स्वास्थ्यासाठी होत असल्याचं देखील अनेक जण अनुभवत असल्याचं सांगितलं जातं. हे लक्षात घेऊन त्याला आयुर्वेद शास्त्राची जोड देऊन, ह्या दोन्ही शास्त्रांच्या समन्वयानं काही पूरक उपचार करता येतील, असं स्पष्ट होत आहे. समाजस्वास्थ्य टिकवण्यासाठी ह्या दोन्ही भारतीय शास्त्रांचा संयोग घडवून खूप काही साध्य होत असल्याचं दिसून येत आहे.

मनाची चंचलता संगीताद्वारे होते कमी
आपलं मन चंचल असतं. त्याच्या अनेक अवस्था बघायला मिळत असतात. अस्थिर मन, अस्वस्थता, चिंता, शोक, क्रोध, मोह, मद, मत्सर, अतिउत्साह, निरुत्साह, दु:ख, आनंद, आत्मविश्वासाचा आभाव, अतिआत्मविश्वास, प्रलाप, भ्रम, दीनता, आळस, डिप्रेशन, वैराग्य अशा अनेक अवस्था आपल्याला अनुभवायला मिळतात, अनेकांमध्ये निरनिराळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या वेळी त्या दिसून येत असतात. ह्या सर्वांतून मनाचं स्थैर्य प्राप्त करणं हे प्रत्येकाचे धेय्य असतं. त्यासाठी संगीतातील रागांचे नवरस उपयोगी पडत असल्याची अनेकांना प्रचीती येत असल्याचं समजतं. जसे रागांचे नवरस आहेत तसेच वाद्यांचेही स्वत:चे मूड्‌स आहेत.

उदाहरणार्थ – सारंगी, व्हायोलीन ही वाद्ये साधाहरणत: कारुण्य दर्शवतात. सतार हे वाद्य आनंदाचं प्रतीक आहे, तर शहनाई म्हणजे मंगलवाद्य म्हणून प्रसिद्ध आहे. असेच प्रकार तालवाद्यांचेही आहेत. ह्या सर्व वाद्यांच्या स्वभावाचाही उपयोग ह्या पूरक उपचारपद्धतीत होत असल्याचं स्पष्ट होतं. आनंदानं उन्मत झालेल्यांना करुण वाद्यावर तोडी राग ऐकवणे हा उपाय असल्याचं म्हंटलं जातं. अत्यंत दु:खी व्यक्तीला सतारीवर श्‍यामकल्याण, केदार असे राग ऐकवणे, डिप्रेशनमध्ये असलेल्या अथवा आत्मविश्वास गमावलेल्या व्यक्तीला वीर रसप्रधान राग ऐकवणे उपयुक्त ठरत असतं. निद्रानाश ह्या अवस्थेवर शांत स्वभावाचे राग बासरीसारख्या गंभीर वाद्यावर ऐकवल्यानं चांगला उपयोग होत असल्याचं दिसून येतं.

शास्त्रीय संगीत मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रागांच्या विशिष्ट वेळा सांगितल्या असल्याचं आपल्याला ज्ञात आहेच. त्या विशिष्ट वेळी तो राग गायल्यास त्याचा मनावर तसंच शरीरावर अनुकूल परिणाम होत असतो. आयुर्वेदातही शरीरातील वात, पित्त, आणि कफ ह्या तीन दोषांच्या दिवस, रात्रींच्या वेळांचं वर्णन केलेलं आढळतं. मनाच्या निर्माण होणा-या विविध अवस्थाही ह्या तीन दोषांमुळे निर्माण होत असतात. त्यांमध्ये वातामुळे मन चंचल, पित्तामुळे क्रोध निर्माण होतो आणि कफामुळे आळस वाढतो. अशा रीतीनं मनाच्या अवस्थांचेही ह्या तीन दोषांप्रमाणे वर्गीकरण करता येऊ शकतं. त्यामुळे दिवसा आणि रात्री ह्या तीनही दोषांची वेळ आणि त्या विशिष्ट वेळेचा राग ह्यांचाही संबंध एकमेकांशी असणं आवश्‍यक असल्याची जाणीव होणं आवश्‍यक असतं. शास्त्रीय संगीत आणि आयुर्वेद ही दोन्ही मूलतः भारतीय शास्त्रं असल्याचं आपल्याला माहिती आहे.

आयुर्वेदीय संगीतोपचार ही अभिनव संकल्पना अशा रीतीने या दोन्ही शास्त्रांचा योग्य मेळ घालून पूरक आयुर्वेदीय संगीतोपचार ही अभिनव संकल्पना उदयाला आल्याचं समजतं. हा उपचार अन्य उपचारांना पूरक असल्याचंही म्हंटलं जातं. आयुर्वेदीय शास्त्रांची त्याला जोड आहे आणि संगीताचा त्यामध्ये उपयोग केल्यानं तो पूरक आयुर्वेदीय संगीतोपचार आहे. ह्या पूरक उपचारांचा उपयोग आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी, स्वास्थ्यासाठी व्हावा, हा मूळ उद्देश लक्षात घेणं आवश्‍यक आहे. अगदी मानसोपचार तज्ज्ञांनाही या उपचारांचा उपयोग करून घेता येत आहे. जसजशी ही संकल्पना विकसित होईल व्यवहारात येईल तसतशी त्या तज्ज्ञांकडून भरही टाकली जाईल, हेही तितकंच खरं आहे.
आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्‌या संगीत महत्वाचं असल्याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 15 मिनिटं संगीत ऐकल्याने आपण व्याधीमुक्त होऊ शकतो. शांत झोप लागू शकते, झोपेतही शारीरिकच, मानसिक शांततेची, विश्रांतीची देखील जरुरी असते.

– प्रा. शैलेश कुलकर्णी

Leave A Reply

Your email address will not be published.