पुणे – काका आणि माजी मंत्री दिलीप कांबळे तसेच बाबांकडून भाजपविषयी माहिती होत गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासकामांमुळे सामान्यांच्या जीवनात फरक पडला आहे, हे पहायला मिळते आहे. मलाही या पक्षाच्या कामात खारीचा वाटा उचलता येतोय याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांची मुलगी सुप्रिया कांबळे हिने व्यक्त केली.
कांबळे यांच्या प्रचारासाठी सुप्रियासह त्यांची दुसरी मुलगी पूर्वा आपल्या मैत्रिणींसह सहभागी झाली आहे. सुप्रिया ही व्हीआयटी महाविद्यालयात बारावीनंतर संगणक शाखेचे शिक्षण घेत आहे; तर दुसरी मुलगी पूर्वा ही फर्गसन महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या रुपाने घरात राजकारणाचा वारसा असल्यामुळे त्यांना लहापणापासूनच निवडणूक, मतदान, पक्षाचे मेळावे, सभांच्या माध्यमातून राजकरणात सहभागी होता आल्याचे त्या म्हणाल्या.
अर्धांगिनीही प्रचारात
सुनील कांबळे यांच्या अर्धांगिनी प्रिती यासुद्धा त्यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरल्या आहेत. बीए शिकलेल्या असून त्यांचा स्वतंत्र केटरिंगचा व्यवसाय आहे. त्या राजकारणात सक्रिय नसल्या तरी पतीच्या राजकीय कारकीर्दीत आहेत. सुनील हे एक सहृदयी माणूस, उत्तम पती आणि समाजाच्या समस्या सोडविण्याची कणव असलेली व्यक्ती आहेत. त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळेच त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या प्रतिसादाचे नक्कीच विजयात रुपांतर होईल, असा विश्वास प्रिती यांनी व्यक्त केला.
मी छोटी असल्यामुळे बाबा माझे लाड करतात. त्यांच्याकडे येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या समस्याही ते तितक्याच आपुलकीने समजून घेतात आणि सोडविण्याचा प्रयत्न करतात. समस्या सोडविल्याननंतर त्या नागरिकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिला की माझ्या मनातला बाबांविषयी आणि भाजपविषयी अभिमान वाढतो.
– पूर्वा कांबळे