बेल्हे- जुन्नर तालुका हा शिक्षणाबाबतीत दहा वर्षांत नावाजला असून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल तालुक्यात झाला आहे. करोनाच्या तडाख्यात जुन्नर तालुक्यातील खासगी शिक्षण संस्था या करोनाच्या तडाख्यात सापडल्या आहेत. शिक्षण संस्थाची प्रगती दोन वर्षांनी मागे जाणार आहे. शैक्षणिक संस्थांना लॉकडाऊन उठल्यानंतर दूरगामी झटके बसणार असल्याची भीती शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
जुन्नर तालुक्यात 352 जिल्हा परिषदेच्या शाळा असून 18 हजार 654 विद्यार्थी शिक्षण घेतात. 1024 शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. जुन्नर तालुका शिक्षण विभागाच्या पुढाकाराने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासनाच्या कार्यक्रमात गुणवत्तेत अग्रेसर आहे. वाचन-लेखन, गणिती क्रिया पाठांतर सर्व बाबतीमध्ये जुन्नरने आत्तापर्यंत गुणवत्ता टिकून ठेवली आहे. सध्या गुणवत्तेवर करोनाचे सावट असल्याने गुणवत्तेला मार बसणार असल्याचे शिक्षण विभागातून बोलले जात आहे.
व्यावसायिक शिक्षणसंस्थांना बाधा
10 वर्षांत तालुक्यात झपाट्याने वाढत गेलेल्या शिक्षण संस्थांमुळे पूर्वीसारखे व्यावसायिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईला जायची गरज नाही. यावर्षी करोनाच्या संकटामुळे व्यावसायिक संस्थाही अडचणीत आल्या आहेत. इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेज, बी फार्म, डी फार्म, वैद्यकीय महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून व्यावसायिक शिक्षण संस्थांना करोनाचा मोठा फटका बसणार आहे. यंदा शैक्षणिक शुल्क वेळेवर मिळणार नाही. व्यावसायिक शिक्षणाचा अभ्यासक्रम बहुधा मोठा असतो. त्यामुळे मागे राहणार आहे. महाविद्यालय केव्हा सुरू होणार, हा कळीचा मुद्दा आहे. त्यात दहावी- बारावीच्या निकालाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात अस्थिरता आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी कसरत करावी लागणार आहे. शेतकरी, व्यावसायिक, दुकानदाराचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. शैक्षणिक संस्थांशी निगडीत पूरक व्यवसायांना त्याची झळ बसणार आहे.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालये संकटात
जुन्नर तालुक्यात 79 माध्यमिक विद्यालय असून 6 महाविद्यालये आहेत. 36 इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. 937 माध्यमिक शिक्षक असून 350 महाविद्यालयीन शिक्षक आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना काही ठिकाणी ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पालक फी कधीच वेळेवर भरत नाहीत.शासकीय अनुदान नसताना विद्यार्थ्यांच्या शुल्कावर इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा गाडा हाकण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांना मोठी अडचण येणार आहे. त्यात शिक्षकांचे पगार, आदी खर्चाचा ताळमेळ जुळविताना नाकीनऊ येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सध्या अनेक प्रश्न आहेत. 10वी 12 वी चा निकाल कधी लागणार. शैक्षणिक कागदपत्रे, प्रवेश, सीईटी, प्रवेश फेरी, शिष्यवृत्ती आदींची चिंता विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. शासनाची सीईटी केंद्रे ही तालुकास्तरावर असावीत. ऑनलाइन प्रवेशासाठी तालुक्यामध्ये किमान तीन ते चार ठिकाणे असावीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.
– वल्लभ शेळके, विश्वस्त समर्थ कॉलेज, बेल्हे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात तालुक्याने गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्थांवर करोनाचे संकट असून गुणवत्तेला बाधा पोहचवित आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याने शिक्षणाची गुणवत्ता ढासळण्याची भीती आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत तेजस प्रकल्पांतर्गत ऑनलाइन इंग्रजी शिक्षणाचा एक महिन्यासाठी प्रयोग केला. परंतु 65 गावे दुर्गम भागात असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणामध्ये अडथळे येत आहेत. यावर्षी नवीन पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.
-पी. एस. मेमाणे, गटशिक्षण अधिकारी, जुन्नर तालुका