बसस्थानकातून 65 हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले

दोन प्रवासी महिलांची कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद

नगर – माळीवाडा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन दोन महिलांच्या पर्समधील 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. माळीवाडा बसस्थानकात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की, शितल दत्तात्रय खराडे (रा. सर्पडोह, ता. करमाळा, जि. सोलापूर, हल्ली रा. चाकण रोड, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) या नाशिक ते अक्कलकोट एसटी बसमध्ये प्रवास करीत होत्या. गुरुवारी दुपारी माळीवाडा बस स्थानकात बस थांबली. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी पर्समधील 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

चोरीचा प्रकार लक्षात येतात खराडे यांनी बसस्थानकातील पोलीस चौकीत धाव घेतली. तेथून कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी शितल खराडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत.

दुसरी घटना माळीवाडा बस स्थानकातच घडली असून आशा देविदास कुंभार (रा. गिरीधरदास विद्यालय समोर, करमाळा, जि. पुणे) या त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी करमाळा येथून नगरला आल्या होत्या. सोलापूर-नाशिक एसटी बस माळीवाडा बस स्थानकात आल्यानंतर त्या बसमधून उतरत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी पर्समधील 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, आधार कार्ड चोरून गेले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आशा कुंभार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माळीवाडा बस स्थानकात यापूर्वीही अनेकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. बसस्थानक परिसरात पोलीस चौकी असूनही चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. चौकीतील पोलीस कर्मचारी गर्दीत लक्ष ठेवण्याऐवजी पोलीस तिथेच बसून राहत असल्यामुळे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. बस स्थानकातील या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.