नवी दिल्ली – दिल्लीत करोना रोगाचा पुन्हा मोठा उद्रेक होत असल्याचे लक्षात आल्यामुळे येथे अलिकडेच सुरू करण्यात आलेली जामा मशिद पुन्हा बंद करावी लागण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती या मशिदीचे प्रमुख शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी दिली.
शाही इमामांचे सेक्रेटरी अमानुल्ला यांचेच करोनामुळे निधन झाल्याची घटना घडली आहे. करोनाचा धोका अजून कमी झालेला नाही त्यामुळे ही मशिद बंद करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी संबंधीत लोकांची मते आजमावली जात आहेत असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आम्ही ही मशिद पुन्हा बंद करण्याच्या विचारात आहोत. येथे नमाज साठी अत्यंत कमी लोकांना सध्या प्रवेश दिला जात असून त्यांनाही एकदोन दिवसा आडच नमाजला अनुमती दिली जात आहे. ही मशिद दोन महिन्यांच्या लॉकडाऊन मुळे 8 जूनला उघडली आहे. मी अन्य मशिदींनाही अशीच उपाययोजना करण्यास सुचवले असून लोकांनी मशिदीत नमाज अदा न करता घरच्याघरी नमाज अदा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
अनलॉक प्रक्रियेअंतर्गत 8 जूनपासून देशातील धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. तथापि दिल्लीतील करोनाचे रुग्ण वाढत असल्याने ही मशिद पुन्हा बंद ठेवण्याचा प्रस्ताव शाही इमामांनीच ठेवला आहे.